काही सुखद! सिंधुदुर्गवासीयांच्या प्रामाणिकपणाचा पुन्हा प्रत्यय 

विनोद दळवी
Tuesday, 15 September 2020

घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये वेळकाढूपणा नाही. गेल्यावर्षी तुलनेत नागरिकांनी कर भरलेला आहे. घरपट्टी 21 टक्के, तर पाणीपट्टी 22 टक्के भरल्याची नोंद आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील नागरिक नेहमीच शासकीय नियमाला महत्त्व देतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. कोरोना विषाणूची महामारी सुरू असल्याने हाताला काम नाही. असंख्य लोक घरीच बसून आहेत. तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी कर चुकवेगिरी केलेली नाही. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये वेळकाढूपणा नाही. गेल्यावर्षी तुलनेत नागरिकांनी कर भरलेला आहे. घरपट्टी 21 टक्के, तर पाणीपट्टी 22 टक्के भरल्याची नोंद आहे. 

एप्रिलपासून हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. एप्रिल ते ऑगस्ट, असे पाच महिने आर्थिक वर्षातील संपले आहेत; मात्र या पाचही महिन्यांत कोरोना प्रभाव राहिला आहे. रोजगार नाही, व्यवसाय नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने यावर्षी ग्रामीण भागातील नागरिक वेळेवर कर भरणार नाहीत, असा अंदाज होता; परंतु ग्रामीण नागरिकांनी तो फोल ठरवित या जिल्ह्यातील नागरिक कितीही आर्थिक संकट आले तरी कर चुकवित नाहीत. शासनाचे नियम पाळतात, हे दाखवून दिले आहे. 

उद्दिष्टाच्या 21 टक्के 
जिल्ह्यात 431 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना 2019-20 व 2020-21, अशी मिळून 20 कोटी 97 लाख 41 हजार एवढी घरपट्टीची मागणी आहे. यातील पहिल्या पाच महिन्यांत 4 कोटी 30 लाख 20 हजार रुपये वसुली झाली आहे. ही वसुली उद्दिष्टाच्या 21 टक्के आहे. 

निश्‍चितच प्रशंसनीय 
गेल्या 2019-20 या आर्थिक वर्षात या पाच महिन्यांत ही वसुली 23 टक्के होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 2 टक्के वसुली कमी झाली आहे. कोरोनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आर्थिक स्थिती नाजूक आहे. दोन वेळचे जेवण मिळविणे मुश्‍किल असताना भरलेला कर निश्‍चितच प्रशंसनीय आहे. 

पाणीपट्टी वसुलीत पुढे 
जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींना मिळून 8 कोटी 21 लाख 22 हजार एवढी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. यात 2019-20 ची थकीत 29 लाख 74 हजार रुपये आहे तर 2020-21 ची 7 कोटी 91 लाख 48 हजार रुपये रक्कमेचा समावेश आहे. यातील 1 कोटी 77 लाख 21 हजार रुपये वसुली झाली आहे. एकूण मागणीच्या 22 टक्के ही वसुली झाली आहे. गेल्यावर्षी या पाच महिन्यात 20 टक्के एवढी वसुली होती. याचाच अर्थ कोरोना प्रभाव असतानाही 2 टक्के वसुली जास्त झाली आहे. म्हणजे यावर्षी वसुली दोन पावले पुढे आहे. 

वसुली कमीची शक्‍यता 
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात घरोघरी साजरा होतो. यावेळी चाकरमानी मोठ्या संख्यने गावात येतात. या कालावधीत ग्रामपंचायत विभाग विशेष मोहीम राबवून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करीत असतो. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आला होता. यावर्षी तो ऑगस्ट महिन्यात आला. त्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये वसुली जास्त झाली होती; मात्र यावर्षी आधीच गणेशोत्सव संपल्याने सप्टेंबरच्या वसुलीवर परिणाम होणार आहे. 

तालुकानिहाय वसुली (घरपट्टी) 

तालुका टक्केवारी 
मालवण 29 
कुडाळ 24 
देवगड 19 
वैभववाडी 19 
सावंतवाडी 18 
वेंगुर्ले 18 
कणकवली 16 
दोडामार्ग 15 

तालुकानिहाय पाणीपट्टी वसुली 

तालुका टक्केवारी 
सावंतवाडी 31 
कुडाळ 27 
मालवण 25 
वैभववाडी 23 
दोडामार्ग 20 
देवगड 19 
वेंगुर्ले 19 
कणकवली 16  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home bill, water bill recovered sindhudurg distict