स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडविणारं होमस्कूलिंग

अमित गवळे
सोमवार, 4 मार्च 2019

पाली - ज्या प्रमाणे मुलांना शिक्षण देण्याची शाळा ही एक व्यवस्था आहे, त्याच प्रमाणे होमस्कूलिंग सुद्धा मुलांना शिक्षण देणारी एक व्यवस्था आहे. त्या माध्यमातून मुलांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडते. होमस्कुलिंग संदर्भातील सर्व पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रिय स्मारकात झाले. येथे शनिवार (ता.२) व रविवार (ता.३) दोन दिवशीय ‘होमस्कूलिंग संवाद’ कार्यशाळा संपन्न झाली.

पाली - ज्या प्रमाणे मुलांना शिक्षण देण्याची शाळा ही एक व्यवस्था आहे, त्याच प्रमाणे होमस्कूलिंग सुद्धा मुलांना शिक्षण देणारी एक व्यवस्था आहे. त्या माध्यमातून मुलांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडते. होमस्कुलिंग संदर्भातील सर्व पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रिय स्मारकात झाले. येथे शनिवार (ता.२) व रविवार (ता.३) दोन दिवशीय ‘होमस्कूलिंग संवाद’ कार्यशाळा संपन्न झाली.

होम स्कूलिंग हा विषय आता गावांमध्येही चर्चिला जातोय. आपल्या पाल्याने खरच या सगळ्या व्यवस्थेमध्ये अडकण्याची गरज आहे का? कि शाळेत न जाताही ‘शिकणं’ घडू शकतं? मग आपण घरीच शिकवलं तर ? अशा अनेक प्रश्नांसह महाराष्ट्रभरातून उपस्थित राहिलेले पालक, आपल्या मुलांचे होमस्कुलिंग करणारे पालक व प्रयोगशील शिक्षक यांनी संवाद साधला. स्मारकाचे कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर यांनी होमस्कुलिंग संवाद आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. आपल्या मुलाला मागील ४ वर्षापासून होमस्कुलिंग करणारे चेतन एरंडे तसेच डॉ. संतोष यांनी शिक्षणक्षेत्राचा त्यांचा अभ्यास व होमस्कुलिंगचा आत्तापर्यंतचा अनुभव याद्वारे या विषयीची मांडणी केली . दोन दिवस चाललेल्या चर्चा, अनुभवकथन आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांनी होमस्कूलिंग या विषयाचे संपूर्ण शंका-समाधान करून घेतले.

सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये न रमणार्या मुलासाठी होमस्कुलिंग हा पर्याय योग्य ठरत असला तरी होमस्कुलिंग करू इच्छिणाऱ्या पालकांनी स्वतःच्या मुलाचा कल ओळखून, आपल्या क्षमता तपासून, या सगळ्याचा शांतपणे अभ्यास करून मगच निर्णय घेतला पाहिजे असे चेतन एरंडे यांनी सांगितले. शिबीरासाठी साने गुरुजी स्मारकाचे प्रोजेक्ट मॅनेजर सतिश शिर्के यांनी मेहनत घेतली.

फायदे
होमस्कूलिंगचा मूळ उद्देश हा मुलांना शिकत असताना पुस्तकाच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादा ओलांडता याव्यात हा आहे. होमस्कूलिंगमध्ये मुलाच्या कुवतीनुसार, आवडीनुसार आणि वेळेनुसार स्वअध्ययनाची संधी दिली जाते. प्रत्येक मुलामध्ये असलेले नैसर्गिक कुतूहल आणि प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती आयुष्यभर जिवंत ठेवण्यासाठी होमस्कूलिंगमध्ये विशेष काळजी घेतली जाते. होमस्कूलिंग करणारी मुले तणावविरहित वातावरणात राहत असल्यामुळे समाजात वावरताना सुद्धा ही मुले सगळ्यांशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. नवीन मित्र लवकर जोडू शकतात तसेच आत्मविश्वासाने आपल्या शंकांचे निरसन करून घेतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeschooling to create an independent personality