esakal | हापूसवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव; ढगाळ वातावरणाचा परिणाम 
sakal

बोलून बातमी शोधा

Hopper Attack On Hapus Due To Cloudy Weather

ऑक्‍टोबर अखेरपर्यंत परतीचा पाऊस सुरूच होता. त्यामुळे यंदा उष्माच जाणवला नाही. त्यानंतरही पुढे म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. एखाद्या दिवस पारा 11.9 अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यानंतर पुन्हा पारा किमान 20 ते 22 अंशापर्यंत स्थिरावला आहे.

हापूसवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव; ढगाळ वातावरणाचा परिणाम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे यंदा आंबा हंगाम एक महिना लांबणीवर पडला आहे. 80 टक्‍के ठिकाणी पालवी फुटलेली आहे. या परिस्थितीत सलग दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा परिणाम आंब्यावर होईल, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

ऑक्‍टोबर अखेरपर्यंत परतीचा पाऊस सुरूच होता. त्यामुळे यंदा उष्माच जाणवला नाही. त्यानंतरही पुढे म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. एखाद्या दिवस पारा 11.9 अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यानंतर पुन्हा पारा किमान 20 ते 22 अंशापर्यंत स्थिरावला आहे. या वातावरणामुळे जमिनीत ओलावा राहिलेला असून जिल्ह्यात 80 टक्‍क्‍याहून अधिक ठिकाणच्या आंबा बागांमध्ये पालवी आहे. पालवी ही तुडतुड्याचे खाद्य आहे.

वातावरणाही पोषक असल्यामुळे तुडतुड्याला पूरक खाद्य सगळीकडेच आहे. पहिल्या स्टेजचा हा तुडतुडा सगळ्याच आंबा कलमांवर दिसत आहे. तो कोवळी पालवी खातो आणि पानांवर सुगरी सोल्युशन असलेले द्रावण टाकतो. ते द्रावण साखरयुक्‍त असून त्यात दवाचे पाणी पडले की एक प्रकारचा चिकट पदार्थ तयार होतो. त्याला चिकटा म्हणतात. दोन ते तीन दिवसात त्याचे रूपांतर कॅपनॉडिअम नावाच्या बुरशीत होते. या बुरशीमुळे आंब्यातील नैसर्गिक आकर्षितता कमी होते. हा चिकटा फळावर पडल्यास त्याचा दर्जा कमी होतो. त्याचा ग्रामीण भाषेत खार पडली असे म्हटले जाते. सध्या तुडतुड्याचा उपद्रव सुरू असून पालवी नष्ट होण्याची भीती आहे. 

हवामान विभागाकडून पावसाचा इशारा दिला आहे. 17 व 18 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी जिल्ह्यात सगळीकडेच ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊसही झाल्यामुळे अनेक बागायतदारांनी कीटकनाशकांची फवारणी थांबवली. कीटकांचा बंदोबस्त केलेल्या अडथळ्यांमुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होणार आहे. यंदा प्रथमच सगळीकडे एकाचवेळी पालवी आलेली आहे. त्यामुळे तुडतुडा दिसत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण कृषी विद्यापिठाने केलेल्या शिफारशीनुसार फवारण्या कराव्यात, असे आवाहन केले जात आहे. पावसामुळे ऑक्‍टोबरमध्ये कीटकनाशकांची फवारणी बागायतदारांना करता आलेली नव्हती. 

दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. आंबा कलमांना फुटलेल्या पालवीवर मोठ्या प्रमाणात तुडतुडा आहे. पावसाच्या शक्‍यतेने कीटकनाशकांची फवारणीही करता आलेली नाही. 
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार