चिंताजनक! आठ तालुक्यांत `येथे` सर्वांत कमी घरपट्टी वसुली

भूषण आरोसकर
शनिवार, 21 मार्च 2020

15 कोटी 96 लाख 28 हजर एवढे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्याची सरासरी 83 टक्‍केएवढी असून यंदा सिंधुदुर्ग जिल्हा 100 टक्‍के वसुली करतो काय ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यात मार्च एंडपूर्वी थकीत घरपट्टी वसूल करणे गरजेचे असल्याने यासाठी ग्रामपंचायत यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर 83 टक्के एवढी घरपट्टी वसुली झाली असून जिल्ह्यातील 8 तालुक्‍यांमध्ये सावंतवाडीची फेब्रुवारी अखेरपर्यंत 66 टक्के सर्वात कमी घरपट्टीची वसुली झाली आहे. सर्वात जास्त घरपट्टीची वसुली वेंगुर्ले तालुक्‍याने 97 टक्के केली आहे. 

मार्चअखेरपर्यंत यंदा 100 टक्के घरपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी याची शक्‍यता दरवर्षीप्रमाणे धूसर दिसून येत आहे. जिल्ह्याच्या प्रशासनासमोर घरपट्टी वसुलीची मोठी समस्या ठाण मांडून असते. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर वसुलीसाठी यंत्रणा मार्च महिना जवळ येताच घाई गडबडीने कामाला लागते; मात्र काही केले तरी घरपट्टी पूर्णतः वसूल होत नाही. अनेक चाकरमानी हे मुंबई व इतर ठिकाणी कामाला असल्याने ते गावी न आल्यास किंवा घरपट्टीची सोय न केल्यास बऱ्याच ठिकाणी घरपट्टीही थकीत होत राहते.

गतवर्षी जिल्ह्याची 94 टक्केएवढी घरपट्टी मार्चअखेर वसूल झाली होती. जिल्ह्यात 431 ग्रामपंचायती 8 तालुक्‍यात आहेत. ज्या तालुक्‍यात जेवढे ग्रामपंचायती आहेत, त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला त्या गावातील वाड्या वस्तीतील घरांची घरपट्टी वसुल करायची असते; मात्र सर्व तालुक्‍यात एकसारखी वसुली होत नाही. घरपट्टी वसुलीतून त्या तालुक्‍यांची कामगिरी जिल्हा प्रशासनाला लक्षात येते.

जिल्ह्यात नुकताच शिमगोत्सव पार पडला. चाकरमानी आणि कोकणचे नाते अधिक दृढ आहे. या शिमगोत्सवानिमित्त दरवर्षी चाकरमानी आपल्या गावी येतात; मात्र पुन्हा परतीच्या प्रवासावेळी ते आपल्या घराची घरपट्टी आवर्जून देतात. त्यामुळे थकीत घरपट्टीला थोडासा हातभार लागतो आणि फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या पंधरावड्यात रखडलेल्या घरपट्टीची टक्केवारी काहीशी वाढते; मात्र यावेळी कोरोना व्हायरस या प्रभावामुळे चाकरमान्यांची संख्या काहीशी रोडावली.

जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत 83 टक्केच घरपट्टी वसूल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. अद्याप 17 टक्के घरपट्टी वसुली थकीत असून अवघा एक महिना शिल्लक असताना आता मार्च अखेरीला पंधरा दिवस बाकी राहिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 19 कोटी 25 लाख 78 हजार एवढी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 15 कोटी 96 लाख 28 हजर एवढे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्याची सरासरी 83 टक्‍केएवढी असून यंदा सिंधुदुर्ग जिल्हा 100 टक्‍के वसुली करतो काय ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

29 फेब्रुवारीपर्यंत तालुक्‍यांमध्ये सावंतवाडी तालुक्‍यातील अवघी 66 टक्‍के घरपट्टी वसुली झाली होती. इतर 7 तालुक्‍यांची 80 टक्‍केच्यावर घरपट्टी वसूल करण्यात यंत्रणेला यश आले होते. यावरून सावंतवाडी तालुक्‍याची कामगिरी फेब्रुवारी अखेरपर्यंत थकीत वसुली करण्यात सर्वांत मागे होती. जिल्ह्यात सर्वांत जास्त घरपट्टी वसूल करण्यात वेंगुर्ले तालुका आघाडीवर होता. फेब्रुवारी अखेरपर्यंत या तालुक्‍याने 97 टक्के एवढी घरपट्टी वसूल करण्यात यश मिळवले होते. त्याखालोखाल मालवण 93 टक्‍के आणि देवगड 91 टक्‍के अशी चांगला कामगिरीने घरपट्टी वसूल केली होती.

मार्चअखेरपर्यंत यांच्या टक्केवारीमध्ये वाढ होणार हे निश्‍चित आहे. जिल्ह्यात दरवर्षी 91 ते 95 टक्के यादरम्यानच घरपट्टी वसूल होते. 100 टक्के घरपट्टी वसूल करण्यात विविध कारणांमुळे अडथळे निर्माण झालेले असतात त्यानुसार यंदा पण घरपट्टी वसूल करण्यामध्येही सिंधुदुर्गाची चांगली कामगिरी असेल, असे चित्र दिसून येत नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत अवघे 83 टक्के घरपट्टी वसूल झाली आहे. अद्याप 95 टक्के एवढी घरपट्टी वसूल करायला निदान 12 टक्के तरी घरपट्टीत या महिन्यात वसूल होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गात सध्या कोरोनामुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. याचा काहीसा परिणाम घरपट्टी वसुलीवर होऊ शकतो, अशी शक्‍यता नाकारता येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: house tax collection in sindhudurg district