esakal | कोकणच्या इतिहासाच्या साक्षीदाराचा नवा साज पर्यटकांना लुभावणारा; दररोज शंभर पर्यटकांची भेट 
sakal

बोलून बातमी शोधा

hundred tourists visit every day Appointment of two staff information tourists

 

दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पर्यटकांना समजणार माहिती 

कोकणच्या इतिहासाच्या साक्षीदाराचा नवा साज पर्यटकांना लुभावणारा; दररोज शंभर पर्यटकांची भेट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : कोकणच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पूर्णगड किल्ल्याला पुरातत्त्व विभागाकडून नवा साज मिळाला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असून नूतनीकरणामुळे कोरोनानंतर किल्ल्यावर दिवसाला शंभरहून अधिक पर्यटक भेटी देत आहेत. सुशोभीकरणामुळे पर्यटकांचा ओघ भविष्यात वाढणार आहे. 

सरकारने राज्यातील काही गड राज्य संरक्षित करत त्यांच्या जतनाचा आराखडा तयार केला. त्यामध्ये तालुक्‍यातील पूर्णगड किल्ल्याचाही समावेश होता. 4 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला. यामधील कामे पूर्ण झाली असून नव्या किल्ल्याचा जुना साज तसाच ठेवत डागडुजी केलेला किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर वॉकिंग ट्रॅक बांधला आहे. त्यामुळे गडावरून समुद्राला येऊन मिळणाऱ्या मुचकुंदीचे विस्तीर्ण खाडी पात्र आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला समुद्र असे विलोभनीय दृश्‍ये अनुभवयाला मिळत आहे. 

रात्रीच्या वेळी हा किल्ला बंद ठेवणार असून देखभालीसाठी किल्ल्यावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्णगडाची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. हा किल्ला डागडुजीनंतर आता नव्या रुपात पर्यटकांसाठी खुला झाला आहे. मुख्य भागातून समुद्राकडील बाजूला जाण्यासाठी तटबंदीत आकर्षक दगडी दरवाजा आहे. पूर्वी या समुद्राकडील तटबंदीच्या पलीकडे जाता येत नव्हते, पण डागडुजीनंतर तशी सुविधा केली आहे. 

हेही वाचा- विजयापर्यंत पोचण्याचा राजमार्ग : मोठी कुटुंबं गळाला लावण्याचे प्रयत्न! -

किल्ल्याचा इतिहास 
मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ. स. 1725 मध्ये किल्ल्याची उभारणी केली. रत्नागिरी आणि जैतापूर दरम्यान समुद्रकिनारी टेहळणी गढी म्हणून याचा उपयोग होता. कान्होजी आंग्रेंच्या मृत्यूनंतर इ. स.1732 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे आला. किल्ल्यावर त्या काळी पेशव्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे वंशज या किल्ल्याच्या परिसरात राहतात. 1818 मध्ये पेशव्यांची सत्ता संपताच पूर्णगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. या किल्ल्याच्या आसपास पूर्वी गाव नव्हते. इथे गाव व बाजारपेठ वसवण्यासाठी पेशवेकाळात 1774 मध्ये गणेशगुळे येथील भिकाजी नारायण फडके यांना सनद देण्यात आली. 

स्थानिकांना रोजगार 
किल्ल्याच्या देखभालीसाठी कर्मचारी नेमता येत नाहीत. त्यासाठी सीएसआरमधून पुण्यातील दोन जणांनी कर्मचारी नियुक्‍तीचा भार उचलला आहे. दोन स्थानिक तरुणांना येथे नेमण्यात आले असून त्यांना रोजगारही मिळाला आहे. सकाळी 7 ते सायं. 7 वाजेपर्यंत किल्ला खुला ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुरातत्त्व अधिकारी विलास वहाणे यांनी दिली. 

ठळक वैशिष्ट्ये
जुना साज तसाच ठेवत डागडुजी 
किल्ला पर्यटकांसाठी खुला 
तटबंदीवर वॉकिंग ट्रॅक 
रात्रीच्या वेळी किल्ला बंद राहिल 

संपादन - अर्चना बनगे

loading image