धक्कादायक ! शेकडो हायस्पीड ट्राॅलर्सची घुसखोरी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

यासंदर्भात पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी आज सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. भादुले यांची येथील कार्यालयात भेट घेऊन गस्तीनौकेबाबत विचारणा केली असता येत्या तीन चार दिवसात गस्तीनौका कार्यान्वित होईल, अशी ग्वाही मत्स्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून दिली. 

मालवण ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी केली असून कोट्यवधी रुपयांच्या मत्स्यधनाची लूट ते करत आहेत. पंधरा ते अठरा वावात हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी दिसून येत आहे. मत्स्य विभागाची गस्तीनौका मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण परतावून लावणार कोण? असा सवाल पारंपरिक मच्छीमार करत आहेत. 

यासंदर्भात पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी आज सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. भादुले यांची येथील कार्यालयात भेट घेऊन गस्तीनौकेबाबत विचारणा केली असता येत्या तीन चार दिवसात गस्तीनौका कार्यान्वित होईल, अशी ग्वाही मत्स्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून दिली. 

श्री. पराडकर म्हणाले, ""मत्स्य हंगाम आता कुठे सुरू होतोय न होतोय तोवर शेकडोच्या संख्येने आलेले परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवून नेत आहेत. स्थानिक मच्छीमार गिलनेट पद्धतीची पारंपरिक मासेमारी करायला गेले असता त्यांना समुद्रात जाळी टाकणेही मुश्‍कील बनले आहे. परराज्यातील अवाढव्य हायस्पीड ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तरी शासनाने वेळीच पराराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण रोखणे गरजेचे आहे. राज्याच्या वाट्याची सागरी संपत्ती परराज्यातील ट्रॉलर्स असेच लुटू लागले तर स्थानिक मच्छीमारांनी करायचे काय? शासनाची गस्तीनौका येईपर्यंत स्थानिक मच्छीमारांना परराज्यातील ट्रॉलर्स मासे शिल्लक ठेवतील असे वाटत नाही. महाराष्ट्राच्या वाट्याचे मत्स्यधन लुटणाऱ्या या ट्रॉलर्सवर राज्य शासनाने लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करावी.'' त्यांना राज्याच्या सागरी हद्दीतून पिटाळून लावावे, अशी मागणी श्री. पराडकर यांनी मत्स्य विभागाकडे केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds Of High speed Trailers Enters In SIndhudurg Area