"गणेश विसर्जन आपल्या दारी" चिपळूणकरांची पर्यावरणपूरक संकल्पना

मुझफ्फर खान
Saturday, 22 August 2020

चिपळूणकरांनी घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेने गणेश विसर्जन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना आणली आहे. मात्र अनेकांनी घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जनासाठी वापरात आणल्या जाणार्‍या पाण्याचा वापर झाडांसाठी खत म्हणून केला जाणार आहे. कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनूसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. 

हेही वाचा - सी व्ह्यू गॅलरी यांच्यामुळे पडल्या ; डॉ. विनय नातू यांची टिका..

शहरातील बहूतांशी नागरिकांनी एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारीच गणरायाला घरी आणले. दिड दिवसाच्या गणपतींचे रविवारी विसर्जन केले जाणार आहे. गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी पालिकेने फिरता कुत्रिम तलाव हा उपक्रम अमंलात आणला आहे. यातूनच गणेश विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी पालिकेने आठ गाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्यांमध्येच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांना सजावट, रोषणाई करण्यात येणार आहे. या गाड्या प्रत्येक प्रभागात जातील. त्या मुख्य ठिकाणी उभ्या राहतील आणि पालिकेच्या छोट्या गाड्याव्दारे या श्री गणेश मुर्ती घराघरांतून घेतल्या जातील व कृत्रिम तलाव तयार असलेल्या गाडीमध्ये आणून विसर्जन केले जाईल. या कृत्रिम तलावात निर्माल्य कळशाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेकांनी घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा - आता मोबाईल वापरा जरा जपुनच ! 

"गणेश मूर्ती विसर्जित होईल अशा आकाराचे पिंप मी विकत आणले आहे. निर्माल्य आणि सजावटीच्या वस्तू काढून मूर्तीचे पिंपाच्या पाण्यात विसर्जन करणार आहे. मूर्ती विरगळल्यानंतर ते पाणी खत म्हणून झाडांसाठी वापणार आहे. या पद्धतीमुळे पर्यावरणपूरक विसर्जन होऊन त्या पाण्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करता येईल. विरेश्‍वर कॉलनी परिसरातील नागरिक विरेश्‍वर तलावाच्या शेजारी असलेल्या विहीरीत दरवर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन करतात. यावर्षी सर्वांनीच घरी मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे." 

- महेश दिक्षित,  विरेश्‍वर मित्र मंडळाचे अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the idea of ganesh visarjan is newly launched by chiplun municipal corporation in chiplun