...अन्यथा या बाटल्यांचे पार्सल जाईल एसीपींकडे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यापेक्षा पोलिस यंत्रेणेला कामाला लावत अवैध दारू व्यवसाय बंद पाडावेत

सावंतवाडी : शहरामध्ये गोवा बनावटीच्या अवैध दारूची विक्री तेजीत सुरू आहे. शहरातील गल्लीबोळात अनेक युवक दारू विक्री करत आहेत. शहराची साफसफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दारू बाटल्यांमुळे हा प्रकार समोर आला. येत्या आठ दिवसात शहरातील हे प्रकार पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी बंद करावे, अन्यथा दारूच्या बाटल्याच पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांना कुरिअर करु, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला. 

हेही वाचा -  ...म्हणून आम्ही पिल्ले विकून टाकली, आता तुम्हांला जातीची पिल्ले मिळणे कठीणचं ! 

नगराध्यक्ष परब यांनी आज पालिकेमध्ये आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरामध्ये गोवा बनावटीची अवैध दारू विक्रीवरुन पोलिस यंत्रणेला टार्गेट केले. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. दरम्यान परब म्हणाले, 'लॉकडाऊनमध्ये राज्याच्या सीमा बंद असतानासुद्धा शहरामध्ये अनेकांनी गल्लीबोळात दारू विक्री करत, एकप्रकारे व्यवसाय सुरू केला.

पालिकेच्या माध्यमातून दररोज शहराची साफसफाई करताना ठिक-ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच आढळून येऊ लागला. पोलिस यंत्रणेचा मात्र या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष असून शहरात सुरू असलेले हे प्रकार येत्या आठ दिवसात बंद नाही झाले, तर शहरात मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या पोलिस अधीक्षकांना कुरिअर करण्यात येणार आहेत. शिवाय या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस प्रशासनाच्या विरोधात येथील पालिकेच्या कौन्सिलमध्ये निषेधाचा ठरावही निश्‍चितपणे मांडला जाणार.' 

हेही वाचा - रत्नागिरीत या ठिकाणी आहे एक महत्वाचा किल्ला ; तुम्हांला माहित आहे का ? 
 

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष 

नगराध्यक्ष म्हणाले, शहरात ठिक-ठिकाणी युवक दारू पिण्यासाठी ठाण मांडतात. पालकमंत्री मात्र या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यापेक्षा पोलिस यंत्रेणेला कामाला लावत अवैध दारू व्यवसाय बंद पाडावेत. जर दारू व्यवसाय बंद नाही झाले तर पोलिस अधिक्षकांच्या विरोधातच बेमुदत उपोषणाला बसेन.  

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal alcohol distributed in villages by youth in sawantwadi