ना ढोलताशांचा आवाज, ना डीजेचा दणदणाट, जपला साधेपणा

अजय सावंत
Monday, 31 August 2020

यावर्षी कोरोना महामारी संकट असताना या संकटावर मात करीत नियमांच्या अधीन राहून गणेशभक्त गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न झाला आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोना महामारी संकट दूर होऊ दे, सर्वांचे रक्षण कर, अशा प्रकारचे गाऱ्हाणे आज नवव्या दिवसाच्या श्रींसमोर घालण्यात आले. `गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या`, अशा भक्तीमय वातावरणात तालुक्‍यात नऊ दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. 

कोकणात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस, एकवीस दिवस घरोघरीं गणेश पूजन करण्याची प्रथा आजही कायम आहे. काही ठिकाणी 42 दिवस श्रींचे वास्तव असते. आज नऊ दिवसाच्या गणेश बाप्पांना तालुक्‍यात भक्तिमय वातावरणात फटाक्‍याच्या आतषबाजीत निरोप देण्यात आला. श्रींचे विसर्जन नदी, तलाव, विहीर याठिकाणी भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

यावर्षी कोरोना महामारी संकट असताना या संकटावर मात करीत नियमांच्या अधीन राहून गणेशभक्त गणेशोत्सव साजरा करण्यात मग्न झाला आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार यावेळी ढोलताशे मिरवणुकीचा प्रभाव शहरी तसेच ग्रामीण भागात कुठेही दिसून आला नाही. प्रत्येक गणेशभक्तांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immersion of Ganesha idols in konkan Sindhudurg