कोकिसरे भुयारी मार्गप्रश्नी तहसीलदारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा सविस्तर....

एकनाथ पवार
Tuesday, 11 August 2020

कोकिसरे रेल्वेफाटकापासून काही अंतरावर भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गाचा आढावा घेण्यासाठी येथील तहसील कार्यालयात माजी आमदार जठार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोकिसरे येथील भुयारी मार्गात जमीन जाणाऱ्या जमीन मालकांची नावे निश्‍चित करण्याची प्रकिया महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात आज झालेल्या बैठकीत तातडीने भूसंपादन प्रकिया पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जठार यांनी अधिकाऱ्यांना केली. 

वाचा - शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये दाखल; नारायण राणेंच्या बंगल्यावर झाला पक्षप्रवेश

कोकिसरे रेल्वेफाटकापासून काही अंतरावर भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गाचा आढावा घेण्यासाठी येथील तहसील कार्यालयात माजी आमदार जठार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याला सभापती अक्षता डाफळे, नायब तहसीलदार ए. के. नाईक, आयकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे वरिष्ठ अभियंता सौरभ मिश्रा, भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, जयेंद्र रावराणे, दिगंबर मांजरेकर आदी उपस्थित होते. 

कोकिसरे रेल्वे फाटकाला पर्यायी मार्गाचा प्रश्‍न कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. त्यानंतर वर्षभरापुर्वी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण, कोकण रेल्वे महामंडळाचे भुयारी मार्गावर एकमत झाले. भुयारी मार्गाबाबत दोन्ही विभागाचे अधिकारी आणि या रस्त्याचा आराखडा तयार करणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांनी प्राथमिक सर्व्हे केला.

हेही वाचा - कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर उद्यापासून सुरू :  वैभव नाईक  

या भुयारी मार्गाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. केंद्र शासनाने या भुयारी मार्गासाठी 64 कोटींचा निधी मंजुर केला. त्यानंतर आता भुयारी मार्गासाठी नेमकी किती जमीन आहे, यासंदर्भातील प्राथमिक ढोबळ माहिती महसूल प्रशासनाने एकत्र केली आहे. या माहितीचा आढावा आजच्या सभेत घेण्यात आला. महसूल विभागाने सर्व सातबारा आयकॉन कंपनीचे वरिष्ठ अभियंता सौरभ मिश्रा यांच्याकडे सुपुर्द केला. 

तत्काळ प्रक्रिया हवी 
दरम्यान बैठकीत माजी आमदार श्री. जठार यांनी भुयारी मार्गासाठी निधी उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीने भुसंपादन आवश्‍यक आहे. दोन महिन्यांत ही प्रकिया पूर्ण झाली तर नोव्हेंबरपर्यंत या भुयारी मार्गाची निविदा निघु शकेल. त्यामुळे भुसंपादन तत्काळ होण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे जठार यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important instructions of tehsildar regarding Kokisare subway