esakal | चुलीवरच जेवण, पुन्हा लाकडांसाठी वणवण ; गॅस दरवाढीचा फटका

बोलून बातमी शोधा

increased rate of LPG gas face problems by rural people in ratnagiri}

सध्या ग्रामीण भागातील ३० ते ४० टक्के महिला चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.

चुलीवरच जेवण, पुन्हा लाकडांसाठी वणवण ; गॅस दरवाढीचा फटका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : धूरमुक्त स्वयंपाकघर या संकल्पनेला छेद देणारी गॅस सिलिंडरची गगनचुंबी दरवाढ केंद्र सरकारने दारिद्रयरेषेखालील नागरिकांसाठी राबविलेल्या उज्ज्वला योजनेला फोल ठरवित आहे. लाभार्थींना मोफत गॅस सिलिंडरचे कनेक्‍शनसोबत प्रथम सहा सिलिंडर मोफत देण्यात आले. सातव्या सिलिंडरपासून दरवाढ थांबलेली नाही. गॅस सिलिंडरची दरवाढ ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

कोरोना साथीनंतर कंबरडे मोडलेले लाभार्थी गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने आधीच अठराविश्‍वे दारिद्रयात जीवन जगत असलेल्या सर्वसामान्यांना गॅस परवडत नसल्याने आता हळूहळू चुलीवरील स्वयंपाकाकडे वळावे लागत आहे. सध्या ग्रामीण भागातील ३० ते ४० टक्के महिला चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. लॉकडाउनचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आला. त्यात काहींची नोकरी गेली. अनेकांचे वेतन कपात झाली.

हेही वाचा - पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच काढला काटा ; व्यावसायिकाच्या खूनाचा झाला उलघडा

अनलॉकनंतर सर्व काही रूळावर येत असल्याचे भासत असतानाच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढीव किमतीने सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांची इंधन जमा करण्याची कटकट मिटली, असे म्हणत नाही, तोच आता कोरोनामुळे नुकसान झालेली अनेक कुटुंबे पूर्वीच्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळली आहेत. चिपळूण तालुक्‍यातील साडेसात हजाराहून अधिक उज्ज्वला गॅसधारकांना दरवाढीचा फटका बसला आहे. 

कोरोना साथीनंतर दरवाढ झालेल्या सिलिंडरसाठी पैशांची जुळवणूक करताना गोरगरिबांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांनी चुलीवर स्वंयपाकाला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे गत काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलसोबतच गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच कोरोना संक्रमनामुळे अनेकांचे व्यवसायही डबघाईला आले आहेत. त्यामुळे दोन वेळेची पोटाची खळगी भरणे सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. 

"अनलॉक झाले असले तरी रोजगार उपलब्ध झालेला नाही. हातमजुरी करून मिळणाऱ्या पैशांत काही बाजूला टाकून त्यातूनही सिलिंडर आणण्याची स्थिती आता नाही. आता लाकडावर स्वयंपाक करणे भाग आहे."

- स्वाती झुजम, कोळकेवाडी

"आम्ही मागील काही महिन्यांपासून गॅसचा वापर कमी केला आहे. शेतातून लाकडे गोळा करून आणतो. सकाळी आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी चुलीचा वापर करतो. सायंकाळचा स्वयंपाक चुलीवर होतो."

- रश्‍मी देसाई, वालोपे चिपळूण

"घरगुती गॅस सिलिंडरच्या भयंकर दरवाढीने पुन्हा चुलीचा वापर वाढीस लागला आहे. सरकारने रॉकेल देणे बंद करून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले. आमच्याकडे दरमहा एक सिलिंडरचा वापर होतो. सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत."

- स्वाती येडगे, अलोरे

"उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर मिळाले. मात्र, दर वाढल्याने आता ते पडवडेनासे झाले आहे. त्यात रॉकेल नसल्याने स्टोव्हसुद्धा बंद आहे. नाइलाजास्तव चुलीवर स्वयंपाकाची वेळ 
आली आहे."

- सरिता काजवे, सावर्डे

संपादन - स्नेहल कदम