esakal | दिल्लीला महसूल पाठवणे झाले बंद अन् सावंतवाडीच्या स्वतंत्र कारभाराची नांदी झाली सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

independent administration of Sawantwadi historical kokan marathi news

खेम सावंत हे लखम सावंत यांच्या लढाया आणि राजकीय निर्णयामध्ये सामील असायचे. त्यांनी गादीवर बसण्याआधीच अनेक लढायांमध्ये शौर्य गाजवले होते.

दिल्लीला महसूल पाठवणे झाले बंद अन् सावंतवाडीच्या स्वतंत्र कारभाराची नांदी झाली सुरु

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : लखम सावंत यांचे पुतणे खेम सावंत यांनीही पराक्रम आणि राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत राज्याचा विस्तार केला. त्यांच्याच काळात सावंतवाडीची उभारणी झाली. विजापूरच्या बादशहाच्या सत्तेचा अस्त आणि दिल्लीचा वाढता प्रभाव या काळात होता. प्राप्त परिस्थितीत खेम सावंत यांनी आपल्या राज्याला स्थैर्य मिळवून दिले. कुडाळदेशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट खेम सावंत यांच्याच कारकिर्दीत झाला. यामुळे सावंतवाडी संस्थानच्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र कारभाराची नांदी याच राजांच्या सत्ताकाळापासून झाली. 

खेम सावंत हे लखम सावंत यांच्या लढाया आणि राजकीय निर्णयामध्ये सामील असायचे. त्यांनी गादीवर बसण्याआधीच अनेक लढायांमध्ये शौर्य गाजवले होते. त्यांची त्या काळातही विजापुरच्या दरबारात ख्याती होती. लखम सावंत यांच्या निधनानंतर 1675 मध्ये खेम सावंत गादीवर आले. ते राजे होताच विजापुरच्या बादशहाने तीन फरमाने काढली. यात खेम सावंत यांनी एकनिष्ठेने वागावे, मोगलांबरोबर मैत्री ठेवू नये आणि शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांना मदत करू नये, असे त्यात उल्लेख होते. त्या काळात खेम सावंत यांना बादशहा मदतीसाठी आपल्या फौजेसह बोलवत असत. त्यांचा एक व्यक्‍ती विजापूरच्या दरबारात कायम राहत असे. 

याच दरम्यान विजापूरमध्ये सत्ता बदलाचे वारे सुरू झाले. 1656 मध्ये महम्मद आदिलशहा याचा मृत्यू होवून त्याचा मुलगा अल्ली हा सत्तेवर आला. दिल्लीच्या बादशहाने ही संधी साधत विजापूरवर हल्ला केला. दिल्लीचे मोगल आणि विजापूरच्या बादशहात संघर्ष वाढतच गेला. अखेर 1673 मध्ये सुलतान अल्ली याच्या निधनानंतर विजापूरची व्यवस्था पूर्ण बिघडली. पुढे दिल्ली सत्ताधिश असलेल्या औरंगजेबाने 15 ऑक्‍टोबर 1683 ला विजापूरच्या बादशाहीचा शेवट केला. ही बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेवून खेम सावंत यांनी मुत्सद्दीपणा दाखवत दिल्लीच्या बादशहाशी मैत्री केली. त्यांच्याकडून 1689 मध्ये कुडाळ परगण्याची देशमुखी मिळण्याबाबतचे फरमान मिळवले. शिवाय बादशहाकडून चार हजार स्वारांची मनसबदारीही मिळवली. 

याच दरम्यान शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. त्यांना शह देण्यासाठी तळकोकणात सरदार अब्दूल रजाकखान या सुभेदाराची दिल्लीच्या बादशहाने नेमणूक केली होती. त्याला मदत करण्याचे काम खेम सावंत यांच्यावर सोपवले होते. हा सुभेदार आणि खेम सावंत यांनी पोर्तुगीजांनी उद्‌ध्वस्थ केलेल्या बांदा बंदराच्या पुर्ननिर्माणाचे काम 1690 मध्ये पूर्ण केले. 

1691 मध्ये सखोजी याच्या रूपाने दक्षिण कोकणात एक नवी ताकद तयार झाली. सावंतवाडी संस्थानने कुडाळच्या प्रभूदेसाईंची ताकद बरीच कमी केली असली तरी ती पूर्ण नष्ट झाली नव्हती. सखोजी याने या प्रभू देसाईंच्या विरोधात बंड केले. त्या दोघांमध्ये अनेक छोट्या लढाया झाल्या; परंतु कोणाचाच विजय झाला नव्हता. सखोजी हा वेंगुर्ले येथे तळ ठोकून होता. कुडाळदेशस्थ प्रभू आणि सावंत भोसले यांना जिंकून आपली सत्ता स्थापन करण्याचा त्याचा प्रयत्न होता. खेम सावंत यांच्यावर 1692 मध्ये सखोजी याने हल्ला केला. आरवली येथे या दोघांमध्ये लढाई झाली. त्यात सखोजीचा पराभव होवून तो पळून गेला. पुढे सखोजी आणि खेम सावंत यांच्यात तह झाला. त्या दोघांनी एकत्र येत कुडाळदेशस्थ प्रभूंचे ठाणे असलेल्या कुडाळवर 1693 मध्ये हल्ला केला. सगळ्यात आधी सखोजीने कुडाळवर हल्ला चढवला. खेम सावंत यांनी मागून येत या लढाईमध्ये भाग घेतला. बराचकाळ ही लढाई चालली. 

संपादन- अर्चना बनगे