परदेशी बोटीवरील जखमीला बंदरात उतरवले पडले महागात, काय आहे प्रकार ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे 2020 एमव्ही मॅजेस्टीक नूर हे जहाज घाऊक साखर घेऊन जाण्यासाठी जे. एस. डब्ल्यू पोर्टला (जयगड) आले होते. या जहाजावरील परदेशी नागरिक संशयित तारेक याझगी यांना जहाजावर काम करताना दुखापत झाली

रत्नागिरी - जहाजावर जखमी झालेल्या परदेशी नागरिकाला दुसऱ्या राष्ट्रात परवानगी न घेता औषधोपचारासाठी उतरणे महागात पडले आहे. पूर्वपरवानगी न घेतल्यामुळे जयगड येथे आलेल्या परदेशी बोटीवरील चारजणांविरुद्ध जयगड पोलिसात फॉरेन ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुनिर इस्माईल कर्लेकर (रा. युनिक मरीन एजन्सी, रत्नागिरी), मोहमद हसन याझगी, तारेक हुसेन याझगी (दोघांचेही सायरिन अरब नागरिकत्व), मलकित सिंग (इंडियन नॅशनॅलिटी, रा. डेहराडून, उत्तराखंड) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना 15 मे 2020 दुपारी दोन ते 16 ला सकाळी सहा ते दहा या कालावधीत जे. एस. डब्ल्यू पोर्ट, जयगड येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे 2020 एमव्ही मॅजेस्टीक नूर हे जहाज घाऊक साखर घेऊन जाण्यासाठी जे. एस. डब्ल्यू पोर्टला (जयगड) आले होते. या जहाजावरील परदेशी नागरिक संशयित तारेक याझगी यांना जहाजावर काम करताना दुखापत झाली. 

औषधोपचारासाठी इथे उतरविण्यासाठी स्थानिक पोलिस अधीक्षक तथा परदेशी नागरिक नोंदणी अधिकारी यांना लेखी विनंती करून पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक होते. संशयित मुनिर कर्लेकर व जहाजावरील कॅप्टन मोहमद याझगी यांनी कोणतीही परवानगी न घेता जखमी खलाशी तारेक याझगी व त्यांच्यासोबत दुय्यम अधिकारी मिलकीत सिंग यांना जहाजावरून दुपारी दोनच्या सुमारास उतरवले.

उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र जयगड व पुढील उपचारासाठी ऊर्जा हॉस्पिटल रुग्णवाहिकेतून रत्नागिरीला नेले होते. त्यानंतर 16 मे 2020 ला पहाटे पुन्हा जहाजावर सोडण्यात आले. त्यामुळे युनिक मरिन शिपिंग एजंट मुनिर कर्लेकर यांच्याविरुद्ध फॉरेनर ऍक्‍ट 1946 चे कलम 14 (सी) प्रमाणे एमव्ही नूर या जहाजावरील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. युनिक मरिन सिटिंग एजन्सी यांची पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी झाल्यानंतर उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured Person On Foreign Boat Landed At Jaygad Port