हापूस आंब्याचे आता हायटेक मार्केट

जी. आय. मानांकन आवश्यक : क्यूआर कोडमुळे शेतकरी ग्राहकांपर्यंत
Innoterra India Pvt Ltd international company buy Hapus Mango high tech market QR code G I tag
Innoterra India Pvt Ltd international company buy Hapus Mango high tech market QR code G I tagsakal

देवगड : कोकणातील जी. आय. मानांकन प्रमाणपत्र घेतलेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा हापूस आता इनोटेरा इंडिया प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून खरेदी केला जाणार आहे. कंपनीने विकसित केलेल्या ब्रँडनेमखाली आंबा विक्री केली जाणार आहे. यातून शेतकरी ते ग्राहक अशी विक्री साखळी उभारली जाणार आहे. ग्राहकांनाही प्रत्येक आंब्यावरील क्युआरकोडवरून शेतकऱ्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे संधीचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी आता जी.आय. मानांकन प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे यांनी केले.स्वित्झर्लंड येथील कंपनीने आंबा विक्री क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने विक्री अभ्यास केला आहे. याबाबत जामसंडे येथील आंबा उत्पादक सहकारी संस्था कार्यालयात संयुक्तपणे पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी इनोटेरा इंडिया कंपनीचे प्रमुख प्रतिनिधी मुकेश खंडेलवाल, दीपक बन्सल, नीलम कर्नाटक, विजय सिंह, संस्था उपाध्यक्ष डी. बी. बलवान, व्यवस्थापक संतोष पाटकर उपस्थित होते.

अ‍ॅड. गोगटे आणि श्री. खंडेलवाल म्हणाले, "कोकणातील जी.आय. मानांकन प्राप्त शेतकऱ्यांचा हापूस स्थानिक पातळीवर खरेदी केंद्राद्वारे संकलित केला जाईल. संकलित केलेल्या आंब्याची प्रतवारी करून त्यावर आवश्यक प्रक्रिया केली जाईल. प्रत्येक आंब्याचे स्कॅनिंग केले जाईल. यामुळे आंब्यामध्ये साक्याचे प्रमाण आहे काय याची माहितीही मिळेल. अशा प्रतवारी केलेल्या प्रत्येक आंब्यावर क्युआरकोड लावून एकाच ब्रँडनेमखाली त्याचे पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत कंपनी आंबा पोचवेल. आंबा आवडल्यास त्यावरील क्युआरकोडवरून ग्राहकाला आंब्याचे ठिकाण, शेतकऱ्याची माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे बागायतदारासोबत काम करून त्यांचा आंबा संकलित करून ग्राहकांपर्यंत निर्धोक आंबा पोचविण्याचा कंपनीचा मानस आहे. कोकणातील हापूस जगभर पोचविण्यासाठी यातून मदत होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळू शकेल. कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी केला जाणार असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी आता उर्वरित बागायतदार शेतकऱ्यांनी जी.आय. प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील सुमारे ३३० शेतकऱ्यांनी जी.आय. प्रमाणपत्र घेतले आहे.

ग्राहकांपर्यंत असा पोहोचणार आंबा

  • सुरुवातीला प्रतवारी करून आंबा खरेदी

  • खरेदी केलेल्या प्रत्येक आंब्याचे होणार स्कॅनिंग

  • प्रत्येक आंब्यावर लावला जाणार क्युआरकोड

  • प्रतवारी केलेला अस्सल हापूस ग्राहकांपर्यंत

  • ग्राहकांनाही उपलब्ध होणार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती

  • एकाच ब्रँडनेमखाली हापूस जाणार ग्राहकांपर्यंत

  • शेतकरी आणि ग्राहकांमध्ये कंपनी दुवा साधणार

खरेदी केंद्र सुरू करणार

यंदाच्या हंगामापासून जामसंडे, तळेबाजार, शिरगाव, पडेल, गिर्ये, पाटगाव, मोंड -बापर्डे, कात्रादेवी, हिंदळे, किंजवडे, इळये आदी भागात हापूस आंबा खरेदी केंद्रे सुरू केली जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com