रत्नागिरीत रुग्णालयांची होणार चौकशी ;रुग्णांवर कोणते उपचार केले, किती केले बिल..?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

खासगी कोविड दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

चिपळूण (रत्नागिरी) : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याची ओरड सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ व कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सानप या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाभरात प्रत्येक तालुक्‍यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. कोविड रुग्णांवर कोणते उपचार केले, किती बिल केले, यासह विविध बाबींची चौकशी करण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यापासून कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. परिणामी बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असून, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. खासगी रुग्णालयात लाखोंची उड्डाण घेणारी वैद्यकीय उपचार बिलेही सध्या हिटलिस्टवर आहेत. शिवसेनेने याचा पर्दाफाश करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा- गावभर कोरोनाचा प्रसाद : क्वारंटाईन व्यक्तीवर शिरोली ग्रामपंचायतीची करडी नजर -

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत. राजकीय पुढारी याबाबत आवाज उठवू लागले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालयांना पेड कोविड हॉस्पिटलसाठी मान्यता दिली आहे, मात्र त्यातूनही रुग्णांची लूट मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. 

राजकीय पुढाऱ्यांनीही यावर आवाज उठवत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या बाबींचा पर्दाफाश होण्यासाठी शिवसेनेकडून उपचार घेतलेल्या रुग्णांची बिले संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या चौकशीतून कोविड रुग्णाकडून खासगी रुग्णालये लाखोंची बिले आकारून त्यांची पिळवणूक करतात की नाही, याचा उलगडा होणार आहे.

हेही वाचा-मंडणगडच्या  कलाकारांनी  बिंबवले कोरोनाचे  गांभीर्य  : -

या बाबींची होणार चौकशी...!
नियुक्त झालेले दोन्ही अधिकारी खासगी रुग्णालयास भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेणार आहेत. यामध्ये कोविड उपचाराची मान्यता मिळाल्यानंतर रुग्णालयात किती रुग्णांवर उपचार केले, त्यांना कोणती औषधे देण्यात आली. रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार केले, त्यांना किती दिवस उपचारासाठी ठेवले, यासाठी किती रकमेची बिले आकारण्यात आली, या सर्व बाबींची चौकशी होणार आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry into private hospitals Treatment for Covid patients in chiplun ratnagiri