कणकवली उड्डाणपुलाचे काम पाहिले, अन् काय म्हणाले जठार? वाचा...

राजेश सरकारे
Wednesday, 22 July 2020

या दोहोंच्या अहवालानंतर आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपूल विस्तारीकरणाची मागणी करणार आहोत. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली शहरात जेथे तीन मिटर पेक्षा अधिक उंचीचा उड्डाणपूल जोड रस्ता आहे, तो काढून टाकून तेथे पिलरबेस उड्डाणपूल व्हावा, अशी भूमिका आहे. तज्ज्ञ अभियंत्यांच्या सल्ल्यानंतर तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवला जाईल आणि तो मंजूर करून आणू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी आज दिली. 

शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याची भिंत आठ दिवसांपूर्वी कोसळली होती. त्यापार्श्‍वभूमीवर नगरपंचायत नियुक्‍त अभियंता तसेच महामार्ग प्राधिकरण नियुक्‍त अभियंत्यांनी आज उड्डाणपूल जोड रस्त्याची पाहणी केली. यावेळी प्रमोद जठार यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, ऍड. विराज भोसले, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते. 

वाचा - गणेशोत्सव तयारी : बाहेरून येणार्‍यांना क्वारंटाईन करण्यावर भर, लवकरच व्हीजन निश्‍चित  : डॉ. इंदुराणी जाखड 

जठार म्हणाले, पाच हजार मि.मी. पाऊस कोसळणाऱ्या कोकणात तीन मिटरपेक्षा अधिक उंचीचा भराव रस्ता टिकू शकत नाही. कणकवली शहरातील उड्डाणपुलाचा रस्ता पाच ते सहा मिटर उंच आहे. त्यामुळे भविष्यातही हा रस्ता कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तीन मिटर पेक्षा जास्त उंचीचा भराव काढून टाकून तेथे वायबीम पिलर टाकण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. त्याअनुषंगाने कणकवली नगरपंचायतीने तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्‍ती केली आहे. तसेच महामार्ग प्राधिकरण विभागानेही आपला अभियंता नेमला आहे. या दोहोंच्या अहवालानंतर आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपूल विस्तारीकरणाची मागणी करणार आहोत. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of Kankavli flyover from pramod Jathar