रत्नागिरीत जलस्रोतांची जिओ फेन्सिंग ऍपद्वारे तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

एक नजर

  •  जिल्ह्यात 8 हजार 502 जलस्त्रोत 
  •  स्रोतातील उपलब्ध घटक समजणार 
  •  पाण्याची पातळी कळणार 
  •  पावसाळ्यापूर्वी व नंतर तपासण्या होणार
  • जिल्हाभरात आरोग्य विभागाची मोहीम 
  • जिल्ह्यात 8 हजार 502 जलस्रोत असून, यातील 3 हजार 802 जिओ टॅग

रत्नागिरी - जलस्रोतामध्ये उपलब्ध घटक आणि पाणी पातळी आदींबाबतची माहिती मिळावी, यासाठी जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही तपासणी होत आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत 1 हजार 246 ठिकाणी भेट देत 1 हजार 134 पाणी नमुने तपासणीसाठी ते प्रयोग शाळेत पाठवले आहेत. 

राज्यावर पाण्याचे मोठे संकट आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत चांगले असावेत यासाठी शासन अनेक प्रयत्न करीत आहे. त्यापैकी एक पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत आहेत, त्यांची विशेष रासायनिक तपासणी जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे करण्यात येत आहे. जिल्ह्यात 8 हजार 502 जलस्रोत असून, यातील 3 हजार 802 जिओ टॅग केले आहेत. या ऍपद्वारे पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर, अशा दोनदा तपासण्या केल्या जाणार आहेत. यंदाच्या तपासणीसाठी 1 मार्चपासून पाणी नमुने घेण्यास सुरवात झाली आहे. 

रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात 100 टक्के करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांच्या मदतीने पाणी व गुणवत्ता सल्लागार या अभियानाचे सनियंत्रण करत आहेत. या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे गोळा करावयाचे आहेत. गोळा केलेले पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोग शाळांतून करण्यात येणार आहे. 

तालुकानिहाय पाठविण्यात आलेले पाणी नमुने 
चिपळूण तालुक्‍यातील 163, दापोली 158, गुहागर 92, खेड 117, लांजा 102, मंडणगड 99, राजापूर 154, रत्नागिरी 147 आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील 102 ठिकाणच्या जलस्रोतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 

...अशी होते तपासणी 
जिल्हा परिषदेच्या यंत्रणेद्वारे वर्षातून दोन वेळा जिओ फेन्सिंग ऍपद्वारे पाण्याची तपासणी होते. स्रोतांजवळ जाऊन स्रोताचा फोटो आणि माहिती अपलोड केली जाते. त्यामुळे शासनाच्या यंत्रणेला त्याची माहिती मिळते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of Ratnagiri water resources with the GeoFencing app