बिबट्याच्या कातड्याच्या तस्करीचा तपास मुळापर्यंत नाहीच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

""कुंभार्ली घाटात यापूर्वी खवले मांजराची तस्करी करताना काहीजण आढळून आले होते. बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे दरवर्षी आढळत आहेत. यामध्ये विक्री करणाऱ्याला अटक केली जाते; मात्र ते कोणाला विकले जाणार होते हे पोलिसांच्या तपासात कधीही पुढे येत नाही. याचे आश्‍चर्य वाटते.'' 
- विकास कदम,
कुटरे, ता. चिपळूण. 

चिपळूण - सर्पविष, खवले मांजर, बिबट्याची कातडी, कासव या वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तस्कर चिपळुणात रंगेहाथ आढळून आले; पण त्यांचे पुढे काय झाले, तसेच ते तस्कर जामिनावर सुटले असून आजही ते पुन्हा याच तस्करीत गुरफटले आहेत. पोलिसांनी तपास गुंडाळला. वन विभागाने हात झटकले. त्यामुळे तस्करांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. वन्यप्राण्यांची सुटका करून तस्करांना अटक केली जात असली तरी तपास मुळापर्यंत जात नसल्याचे वास्तव आहे. 

सह्याद्रीच्या खोऱ्यातून लाखो रुपयांचे सर्पविष मोठ्या शहरात पाठवले जाते. कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी या विषाचा उपयोग केला जात असल्याने त्याला मोठी मागणी आहे. विषारी सर्प पकडून त्याचे विष काढणारे अनेकजण चिपळूणमध्ये कार्यरत आहेत; मात्र ते पोलिसांना सापडत नाहीत. मागील दोन वर्षे झाली, बिबट्याची कातडी विकणाऱ्या टोळीला चिपळूण पोलिसांनी पकडले. गुहागरमधील काहींना पालघर जिल्ह्यात पकडण्यात आले.

चौकशीतून एकमेकांची नावे पुढे येत गेली आणि पोलिसांनी त्यांना शिताफीने अटकही केली. त्यांच्याकडून लाखोंचे कातडे जप्त केले. या कातड्यावर बिबट्याला गोळी मारून हत्या केल्याची खूण होती. तपासाची व्याप्ती वाढत गेली; पण अटक केलेल्या संशयितांनी बिबट्याची शिकार कुठे केली, कातडी कोठून आणली, याचा शेवटपर्यंत उलगडा झाला नाही. संशयित आता जामिनावर बाहेर येऊन पुन्हा उजळ माथ्याने फिरत आहेत. 

गेल्या आठवड्यात कामथे येथे बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. यावरून तालुक्‍यात बिबट्या कातड्याची तस्करी करून त्याची विक्री करणारे रॅकेट असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर वन विभागाने कारवाईची माहिती घेतली. कातडे बिबट्याचे आहे की, अन्य प्राण्याचे हे स्पष्ट केले; परंतु पोलिसांना तपासात कोणतीही मदत केली नाही. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आता पाचव्याचा शोध सुरू आहे. 

""कुंभार्ली घाटात यापूर्वी खवले मांजराची तस्करी करताना काहीजण आढळून आले होते. बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे दरवर्षी आढळत आहेत. यामध्ये विक्री करणाऱ्याला अटक केली जाते; मात्र ते कोणाला विकले जाणार होते हे पोलिसांच्या तपासात कधीही पुढे येत नाही. याचे आश्‍चर्य वाटते.'' 
- विकास कदम,
कुटरे, ता. चिपळूण. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: investigation of leopard Skin smuggling is not enough