भास्कर जाधव, संजय कदम, सुनिल तटकरेंनाही डावलले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

चिपळूण - पिंपळी येथे उभारलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांनाही मिळाले नाही. येत्या अधिवेशनात हा विषय गंभीरपणे मांडणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली. 

चिपळूण - पिंपळी येथे उभारलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांनाही मिळाले नाही. येत्या अधिवेशनात हा विषय गंभीरपणे मांडणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली. 

चिपळूण तालुक्‍यातील पिंपळी येथे कोकणातील पहिला अतिरिक्त ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारला. उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्याचे नुकतेच उद्‌घाटन केले. मात्र ब्रेक टेस्टिंग ट्रॅक मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणारे तहसीलदार जीवन देसाई यांनाही उद्‌घाटनाचे निमंत्रण दिले गेले नाही. मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्‍यातील वाहन चालकांसाठी  ट्रॅक उभारले आहेत. त्यामुळे या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे गरजेचे होते. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रोटोकॉल पाळला नाही. त्यामुळे उत्तर रत्नागिरी भागात आरटीओच्या कारभाराबाबत नाराजी आहे. उद्‌घाटनाचा कार्यक्रम शिवसेनेचा होता असा आरोपही सुरू झाला आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत.

ते म्हणाले, उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधींचा अपमान केला आहे. ज्या भागातील लोकांसाठी हे ट्रॅक उभारण्यात आले आहे. तेथील लोकप्रतिनिधींना उद्‌घाटन कार्यक्रमाचे आमंत्रण देणे गरजेचे होते. हे ट्रॅक केवळ तालुक्‍याचे नसून संपूर्ण उत्तर रत्नागिरी भागासाठी आहे. अतिरिक्त ब्रेक टेस्टिंग ट्रॅक व्हावा यासाठी मी पण प्रयत्न केले होते. चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांनी माझ्याकडे जागेचा प्रश्‍न मांडला. ब्रेक टेस्टिंग ट्रॅकचा माझ्या मतदारसंघातील लोकांना फायदा होणार असल्यामुळे तातडीने जागा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Breaking testing track invitation