गड-किल्ले संरक्षित करण्याच्या केवळ घोषणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

देवरूख - तालुक्‍यातील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच गड-किल्ल्यांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. पुरातत्त्व खात्याची उदासीनता, शासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचे सोयीचे राजकारण या गड-किल्ल्यांना अखेरची घटका मोजायला कारणीभूत ठरले आहे. 

देवरूख - तालुक्‍यातील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच गड-किल्ल्यांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. पुरातत्त्व खात्याची उदासीनता, शासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचे सोयीचे राजकारण या गड-किल्ल्यांना अखेरची घटका मोजायला कारणीभूत ठरले आहे. 

संगमेश्‍वर तालुक्‍यात दोन ऐतिहासिक गड आहेत. सद्यस्थितीत दोन्ही किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. हे संरक्षित करण्याच्या केवळ घोषणा होतात. त्यापुढे काहीच नाही. यामुळे या किल्ल्यांना आता अखेरची घरघर लागली आहे. इतिहास वाचायचाच नव्हे तर वाचवायचा असेल तर गड किल्ल्यांच्या जतनासाठी पुढाकार घेणे काळाची गरज बनले आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍याच्या पश्‍चिमेला सह्याद्रीच्या पर्वतराजीवर निगुडवाडीजवळ हा किल्ला वसला आहे. स्वारीवरून दमून आलेल्या मावळ्यांच्या विश्रांतीसाठी महाराजांनी हा किल्ला उभारल्याचे सांगितले जाते. याला महिमानगडाप्रमाणे महिपतगड असेही म्हणतात. येथे थंड पाण्याची तळी, घोडेतलाव, दोन मंदिरे, प्रवेशव्दार, तटबंदी, तोफा आजही पाहायला मिळतात.

रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील प्रचितगड संगमेश्‍वर तालुक्‍याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या उंच कड्यावर आहे. येथे सात दरवाजांचे तळे, घोडेतलाव, बारमाही थंड पाण्याचे तळे, भवानी माता मंदिर, तोफा, प्रवेशव्दार, तटबंदी असा ऐतिहासिक ऐवज आजही पाहायला मिळतो. 

गडावरील भवानीमातेची मूर्ती स्वयंभू आहे.शेकडो पर्यटक व भाविकांची वर्दळ असते. मात्र, देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गडावर जाणारी एकमेव शिडी धोकादायक आहे. तटबंदी ढासळत आहे. 

आगामी पिढ्यांना शिवाजी महाराजांचा पराक्रम केवळ पुस्तकात वाचायला मिळण्यापेक्षा अशा गड किल्ल्यांचे संरक्षण करून तो इतिहास बघायला मिळावा, यासाठी या सर्वांचे जतन अपेक्षित आहे. शासनाने गड किल्ल्यांचे जतन करावे. त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. 
- सुरेंद्र माने,
सृष्टी नेचर क्‍लब, देवरूख

गड किल्ले हे इतिहासाचे प्रतिक आहे. त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचावा, यासाठी शासनाला आम्हीही मदत करू. मात्र, सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा.
- युुयुत्सू आर्ते,
संस्थापक, राजू काकडे हेल्प ॲकॅडमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Conservation of fort and castle