महामार्गचाैपदरीकरण : छोटी शहरे भकास होण्याची भीती 

मुझफ्फर खान
बुधवार, 15 मे 2019

चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही.

चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही. चौपदरीकरणाने मोठी शहरे जोडली जात आहेत; मात्र छोटी गावे भकास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. 

येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश मोरे याबाबत सांगतात, "रस्त्याच्या एका बाजूला लोकवस्ती आणि दुसऱ्या बाजूला शेती, शाळा काळकाईचे मंदिर आणि बाजारपेठ आहे. भरणेनाका येथील विद्यालयात परिसरातील 4 हजार 500 विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यातील पंधराशेहून अधिक विद्यार्थी बाहेरगावचे असतात. येथे विद्यालय एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला बसस्थानक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी महामार्ग क्रॉस करावा लागतो. शेतकऱ्याला जनावरांचे दूध काढायचे असेल किंवा गुरांना सोडायचे असले तरीही रस्ता क्रॉस करावा लागतो. ग्रामस्थांना एखादी वस्तू आणायची झाली तरी रस्ता क्रॉस करावा लागतो. मेलेल्या माणसाला स्मशानात पोचवण्यासाठीही रस्ता पार केल्याशीवाय पर्याय नसतो. चौपदरीकरणात जुन्या रस्त्यावर भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. यामुळे लोकवस्ती खाली आणि रस्ता वर अशी स्थिती येथे निर्माण होणार आहे. 

येथील बाजारपेठ कायम राहावी, चौपदरीकरणाचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्‍यक ठिकाणी भुयारी मार्ग, उडाणपूल, सर्व्हिसरोड आणि रस्त्यावर जागोजागी डिव्हायडर असणे गरजेचे आहे. भरणे नाका ते शिंदेवाडीपर्यंतच्या रस्त्याची काळजी घ्यावी,अशी विनंती ग्रामपंचायतीकडून केली. आम्ही पाठपुरावा केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यांनी जाग्यावर जावून स्थानिकांचे मत समजून घेतले. कोणत्या ठिकाणी भुयारी मार्ग, उडाणपूल आणि किती लांबीचे सर्व्हिसरोड असावे,याची माहिती ग्रामस्थांनी दिली. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद करून घेतली; मात्र निर्णय काय झाले हे अद्याप सांगितले जात नाही. चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे येथे कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, याची माहिती ग्रामस्थांना नसल्याचे त्यांनी सांगितले. 

महामार्ग विभागाचे अधिकारी साईटवर फिरकत नाहीत. पत्रव्यवहार केल्यानंतर त्याचे उत्तर मिळत नाही. लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांसमोर मोजकेच बोलतात. महामार्ग विभागाचे कार्यालय रायगड जिल्ह्यातील पेण येथे आले. खेडमधून पदरमोड करून पेणला गेलो तरी अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे नक्की जाब कोणाला विचारायचा? 
- अनिल पाटणे
, भरणे. ता. खेड 

काय हवे? 
* आंबवली रोड भरणे नाका मार्गे आवश्‍यक 
* नवभारत हायस्कूलसाठी मार्ग हवा 
* काळकाई मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग हवा 
* जाधववाडी - फगेवाडीसाठी मार्ग हवा 
* गवळवाडीसाठी मार्ग हवा 
* शिंदेवाडी, कातळवाडीसाठी मार्ग हवा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai - Goa four track highway