मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीने हाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

एक नजर

  • मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
  • प्रवासी तसेच वाहन चालक बेहाल
  • कणकवली शहरातील अंतर्गत रस्ते देखील वाहतूक कोंडीने ठप्प

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी तसेच वाहन चालक बेहाल झाल्याचे चित्र होते. शहरातील अंतर्गत रस्ते देखील वाहतूक कोंडीने ठप्प झाले होते. महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरण कामासाठी केलेले ठिकठिकाणचे अडथळे आणि त्यावर मार्ग काढण्यात संबंधित अधिकाऱ्यांना आलेले अपयश याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील तेलीआळी डीपी रोड ते नरडवे तिठा या दरम्यान सर्व्हिस रोड तयार करून वाहतूक सुरू केली आहे; मात्र हा सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यालगत वाहन पार्किंग होत असल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. याखेरीज डीपी रोड येथे जंक्‍शन झाल्यानेही वाहने अडकून पडत आहेत.

महामार्गावरील वाहतूक कोंडी सुसह्य होण्यासाठी महामार्गावरील पटवर्धन चौक ते तेलीआळी डीपी रोड दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविल्यास कोंडीतून सुटका होऊ शकते. मात्र त्याकडे हायवे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची टीका शहरवासीयांतून होत आहे. कणकवली नगरपंचायतीने तेलीआळी डीपी रोड येथील अतिक्रमणे हटविली तर महामार्ग विभागाकडून त्यांच्या हद्दीमधील अतिक्रमणे का हटविली जात नाहीत? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आज सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल चार किलोमिटर अंतरापर्यंत वाहने खोळंबली होती. दुपारचा तीव्र उकाडा आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे प्रवासीही बेहाल झाल्याचे चित्र होते.

Web Title: issue of Mumbai Goa Highway four track