महामार्गचाैपदरीकरण : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लाखोंचा भुर्दंड 

मुझफ्फर खान
मंगळवार, 14 मे 2019

चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे. 

चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे. 

दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका येथील रस्त्यालगतचे दुकान गाळे, निवासी इमारती सहा महिन्यांपूर्वी तोडण्यात आल्या. जुनी गटारे बुजविण्यात आली. त्यामुळे सांडपाणी जाण्यासाठी मार्गच नाही. नव्याने बांधलेल्या गटारी जमिनीपासून उंच आहेत. त्यामध्ये सांडपाणी सोडून दिले जात नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. गावातून येणारे नाले, पऱ्हेचे नैसर्गिक स्त्रोत अडविले आहेत. पावसाळ्यात त्याचे गंभीर परिणाम दिसणार आहेत. प्रामुख्याने रोगराईचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे. येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी भरणे ग्रामपंचायतीने ग्रॅव्हिटीने पाईपलाईन टाकली आहे.

गटारीचे काम करताना ती वारंवार फोडली जाते. पाईप लाईन फुटल्याची माहिती ग्रामपंचायतीला दिली जात नाही. ज्यावेळी ग्रामपंचायतीला लाईन फुटल्याचे लक्षात येते तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलेले असते. ग्रामपंचायतीला स्वःखर्चाने पाईपलाईन दुरूस्त करावी लागते. तोपर्यंत गावात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा योजनेचा पंप दोनवेळा जळाला. पंपाची वायरिंग चुकीच्या पद्धतीने जोडली जाते त्यामुळे अनेकवेळा पंप उलटे फिरतात. त्याचाही खर्च ग्रामपंचायतीलाच करावा लागतो. आत्तापर्यंत सुमारे सहा लाखांचा भुर्दंड ग्रामपंचायतीला बसला आहे. 

रस्त्यालगतचे पथदीप बदलण्याचे काम सुरू आहे. तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पथदीप उभे करण्यासाठी जमिनीत खोल खड्डा न मारता छोटे छोटे खड्डे मारण्यात आले आहेत. वादळी-वाऱ्यात ते कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

कामाच्या पातळीवर 
जुनी गटारे बुजवल्याने सांडपाणी जाण्यास मार्ग नाही 
नव्याने बांधलेल्या गटारी जमिनीपासून उंचीवर 
त्यामध्ये सांडपाणी सोडू न दिल्याने ते रस्त्यावर 
गावातून येणारे नाले, पऱ्हेचे नैसर्गिक स्त्रोत अडविले 
पावसाळ्यात रोगराईचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती 
पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया 

चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने गटार बांधणे, पथदीप बदलणे व इतर कामासाठी पोट ठेकेदार नेमले आहेत. ते स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीला अजिबात विश्‍वासात घेत नाहीत. ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. एखादी गोष्ट तोंडी सुचवायला गेलो किंवा चुकीच्या कामाचा जाब विचारला तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. 
- ललिता जाधव,
सरपंच भरणे ग्रामपंचायत 

रस्त्यालगत कुठे पाईपलाईन आहे याची माहिती असलेला कर्मचारी भरणे ग्रामपंचायतीने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीला दिला. इथे पाईपलाईन आहे तोडफोड करू नका कर्मचाऱ्याने सांगितले तरी कंपनीचे कामगार त्याचे ऐकत नाहीत. 
- संतोष नलावडे,
उपसरपंच भरणे ग्रामपंचायत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai Goa Highway four track Ground report