तळेरे-कोल्हापूर दुपदरीकरण धूळफेकच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

वैभववाडी - तळेरे-कोल्हापूर (166 जी) या राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेल्या कोकिसरे फाटकानजीकच्या नियोजित भुयारी मार्गाचे कामदेखील रखडले आहे. असे असले तरी काही राजकीय नेते जनतेच्या डोळ्यात सतत धूळफेक करीत तारीख पे तारीख देताना दिसत आहेत. 

वैभववाडी - तळेरे-कोल्हापूर (166 जी) या राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेल्या कोकिसरे फाटकानजीकच्या नियोजित भुयारी मार्गाचे कामदेखील रखडले आहे. असे असले तरी काही राजकीय नेते जनतेच्या डोळ्यात सतत धूळफेक करीत तारीख पे तारीख देताना दिसत आहेत. 

विजयदुर्ग-कोल्हापूर राज्यमार्गाच्या तळेरे-कोल्हापूर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. या मार्गाला 166 जी असा क्रमांक देण्यात आला. त्यानंतर सातत्याने या मार्गाचे सर्वेक्षण विविध पातळ्यांवर सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग वगळता सर्वाधिक वाहतूक असलेल्या या महामार्गाचे दुपदरीकरण होणार, अशी चर्चादेखील मागील वर्ष दीड वर्षात सुरू झाली.

दरम्यान 84.34 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या दुपदरीकरणाचा कामाचा प्रस्ताव भोपाळ येथील आयकॉन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीने तयार केला. या कामाचे तीन टप्पे तयार केले आहेत. पहिला टप्पा तळेरे ते गगनबावडा असा 30.670 किलोमीटरचा असून त्यासाठी अंदाजे 273.80 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरा टप्पा गगनबावडा ते कोल्हापूर असा 51.770 किलोमीटरचा आहे. त्यासाठी 463.59 कोटी खर्च येणार आहे. तिसरा टप्पा हा बहुचर्चित कोकिसरे रेल्वे फाटकानजीक भुयारी मार्ग आणि 1.90 किलोमीटरचा जोडरस्ता असा आहे. त्यासाठी 57 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

या मार्गाचे दुपदरीकरण आणि भुयारी मार्ग व जोडरस्ता यासाठी एकूण 794.39 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आयकॉन्स कंपनीने तयार केला आहे. हा संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून रस्त्यांची रुंदी 10 मीटर असणार आहे. या रस्त्याचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाची मंजुरी रखडली आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर या मार्गाला तातडीने मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र आचारसंहिता संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु अजूनही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी ठरलेले कोकिसरे रेल्वे फाटकानजीकचा नियोजित भुयारी मार्गाचे कामही रखडले आहे. एकीकडे महामार्ग मंजुरीची प्रकिया रखडली असताना दुसरीकडे काही नेते हे काम मंजूर झाल्याचे सांगून धुळफेक करीत आहेत. सतत तारीख पे तारीख देत आहेत; मात्र प्रत्यक्षात या कामाला अजूनही मंजुरी मिळालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. 

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी 

  • 84.34 किलोमीटरचा महामार्ग 
  • पहिला टप्पा- तळेरे-गगनबावडा रस्ता दुपदरीकरण, अंदाजे खर्च 273.80 कोटी. 
  • दुसरा टप्पा- गगनबावडा ते कोल्हापूर, अंदाजे खर्च - 463.59 कोटी रुपये. 
  • तिसरा टप्पा- भुयारी मार्ग व जोडरस्ता, अंदाजे खर्च 57 कोटी रुपये. 
  • 10 मीटर रुंदीचा रस्ता 
  • संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण 

महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामांचा प्रस्ताव मार्चपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप या कामाला मंजुरी मिळालेली नाही. 
- एस. बी. गुळवणी,
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Talere - Kolhapur Double track