Ratnagiri : मच्छीमारांच्या सहकार्याने समुद्र प्रदूषण थांबविणे शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

मच्छीमारांच्या सहकार्याने समुद्र प्रदूषण थांबविणे शक्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णै : समुद्रातील प्रदूषण मच्छीमारांच्या सहकार्यानेच थांबविता येणे शक्य आहे. समुद्र स्वच्छ झाल्यास मच्छीमारांवरील मासळी दुष्काळाचे संकट दूर होईल. भारताच्या किनारपट्टीवर सुमारे दोन लाख ६९ हजार मासेमारी बोटी कार्यरत आहेत. या बोटींना मासेमारी करीत असताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जाळ्यात येतो. हा कचरा किनाऱ्यावर आणल्यास समुद्री पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी केले.

नेटफिश- एमपीईडीए (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार) या संस्थेतर्फे हर्णै बंदर येथे स्वच्छता पखवाडा-२०२१ साजरा करण्यात आला. नेटफिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम यांनी समुद्री प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. श्री. कदम यांनी सागरी प्रदूषण टाळण्याचे तीन प्रकारे व्यवस्थापन कसे करता येईल, हे पटवून सांगितले. प्रथम मासेमारी करताना तुटलेली जाळी व प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जाऊ नये, मासेमारी जाळ्यांना चिन्हांकित करण्याविषयी जनजागृती करावी लागेल. दुसरे म्हणजे बायोडिग्रेडेबल मासेमारी जाळ्यांचा वापर केला तर समुद्री सस्तन प्राण्यांची अनावश्यक मासेमारी कमी करता येईल. तिसरे म्हणजे समुद्रात टाकल्या गेलेल्या तुटलेल्या जाळ्या व प्लास्टिक कचरा किनाऱ्यावर घेऊन येणे व तो रिसायकलिंगसाठी देणे, अशा प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते. त्यासाठी मच्छीमारांचे बहुमोल सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे कदम यांनी सांगितले.

स्वच्छता पखवाडा-२०२१ हा कार्यक्रम दोन टप्प्यांत साजरा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मासेमारी भागधारकांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती करणे व मासेमारी करताना जाळ्यात येणारा प्लास्टिक कचरा स्वच्छ करून समुद्रकिनारी आणण्यासाठी प्रवृत्त करणे, दुसऱ्या टप्प्यात मासेमारी बोटींनी आणलेला कचरा किनाऱ्यावर आणून तो रिसायकलिंगसाठी देणे. यातील पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमासाठी मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुसऱ्या टप्प्यात मासेमारी जाळ्यातील कचरा गोळा करण्यात येणार असून, त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल. कार्यक्रमाला हर्णै बंदर मच्छीमार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पावसे, उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर, हरेश कुलाबकर, भानुदास चोगले, गोपीचंद चोगले आदी उपस्थित होते.

loading image
go to top