कणकवलीत करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे : कन्हैया पारकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे : कन्हैया पारकर

कणकवलीत करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे : कन्हैया पारकर

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली शहरातील निवासस्थाकडेजाणारा रस्ता पूर्ण झालेला आहे; मात्र या रस्त्याच्या भूसंपादनासाठी नगरपंचायत पंचवी सलाख रूपये खर्च करणार आहे. खासगी क्षेत्रातील रस्त्यासाठी कणकवली शहरवासीयांचा करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे आहे, असा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी आज केला.

कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी अवधूत तावडे व इतर नगरसेवक या सभेला उपस्थित होते. सभेत सर्वप्रथम नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल तसेच कोरोना कालावधीत बळी पडलेल्‍या नागरिकांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. आजच्या सभेत राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाचा विषय गाजला. शहरातील नाथ पै नगर येथील केंद्रीय मंत्री राणेंच्या घराकडे जाणाऱ्या परिसरात अंतिम रेखांकन मंजूरी नसताना घरांना परवानगी देण्यात आली. त्‍यामुळे येथील रस्ते जमीन मालकांच्या नावे राहिले आहेत. हे रस्ते नगरपंचायतीकडे वर्ग करून घेण्यासाठी २५ लाख रूपये निधी देण्याबाबतचा मुद्दा आजच्या सभेत चर्चेला आला. यावेळी विरोधी पक्षाचे नगरसेवक पारकर यांच्यासह नगरसेवक नार्वेकर यांनी नगरपंचायतीचा निधी राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खर्च करण्याला तीव्र विरोध केला.

उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी श्री. पारकर यांचे आरोप खोडून काढले. कणकवली शहरात ग्रामपंचायत असताना अंतिम रेखांकन न करताच नाथ पै नगर परिसरातील घरांना बांधकाम परवानगी देण्यात आली. अजूनही त्‍या परिसराचे अंतिम रेखांकन झालेले नाही. त्‍यामुळे तेथील रस्ते नगरपंचायतीच्या ताब्‍यात आलेले नाहीत. रस्त्यांची जागा खासगी जमीन मालकांच्या नावे राहिली आहे. त्‍यामुळे रीतसर भूसंपादन प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेला जिल्‍हाधिकाऱ्यांनीही मंजूरी दिली आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाबाबतचा ठराव मागील सभेमध्ये झाला होता. त्‍यावेळी श्री. पारकर यांनी याबाबत आक्षेप घ्यायला हवा होता.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

त्‍यांना जिल्‍हाधिकाऱ्यांकडेही याबाबत दाद मागता आली असती; पण तसे न करता ते सभागृहात गदारोळ करत असल्‍याचा आरोप उपनगराध्यक्ष श्री. हर्णे यांनी केला. श्री. पारकर यांनी आपल्‍यावर आरोप फेटाळून लावले. नाथ पै नगर भागात झालेल्‍या रेखांकनाची कागदपत्रेही त्‍यांनी सभागृहात दाखवली. जर राणेंच्या घराकडे जाणारा रस्ता नव्हता, रेखांकनामध्ये तशी तरतूद नव्हती असे जर सत्ताधारी सांगत असतील तर राणेंच्या बंगल्याला परवानगी कशी मिळाली? असा सवालही श्री. पारकर यांनी उपस्थित केला. यानंतर या मुद्दयावर उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजित मुसळे आणि नगरसेवक पारकर, रूपेश नार्वेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या मुद्दयावर दोहोंकडून दावे-प्रतिदावे होत राहीले होते.

"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराकडे जाणारा रस्ता हा खासगी आहे. नगरपंचायत विकास आराखड्यात हा रस्ता समाविष्‍ट नाही. त्‍यामुळे एका व्यक्‍तीच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायत फंडातील पंचवीस लाख रूपये खर्च करणे ही चुकीची बाब आहे. शहरात अनेक वाड्यातील नागरिक रस्त्यापासून वंचित आहेत. त्‍यांच्यासाठी पंचवीस लाखाचा खर्च नगरपंचायत का करत नाही?

- कन्हैया पारकर, नगरसेवक

loading image
go to top