सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गातील `ही` बाजारपेठ आजपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

सुरक्षितता म्हणून देवगड नांदगाव रस्त्यावरील जामसंडे आयटीआय ते वडांबापर्यंतच्या मार्गावरील दुकाने उद्यापासून बंद ठेवण्याचा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेण्यात आला. यामध्ये अत्यावश्‍यक सेवाही बंद राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - येथील देवगड -जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सुरक्षितता म्हणून जामसंडे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उद्यापासून (ता. 4) स्वयंस्फुर्तीने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज येथील ग्रामीण रूग्णालयात 161 जणांच्या झालेल्या कोरोना जलद चाचणीमध्ये (रॅपीड टेस्ट) 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये पाच पोलीसांचा समावेश असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. 

येथील शहरात गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्ह रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. जामसंडे परिसरात कोरोना पॉझिटिव्हचे रूग्ण सापडल्याचे समोर येताच प्रशासनाची डोकेदुखी वाढली. त्यांच्या संपर्कातील अन्य तिघांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. येथील शहरात कोरोना पॉझिटिव्हचे रूग्ण आढळत असल्याने चिंतेची बाब मानली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे सावट पसरले. त्यामुळे आज सकाळी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्याशी स्थानिक व्यावसायिकांनी चर्चा केली.

सुरक्षितता म्हणून देवगड नांदगाव रस्त्यावरील जामसंडे आयटीआय ते वडांबापर्यंतच्या मार्गावरील दुकाने उद्यापासून बंद ठेवण्याचा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेण्यात आला. यामध्ये अत्यावश्‍यक सेवाही बंद राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली. काही दिवस बाजार बंद राहण्याची शक्‍यता आहे. याच पार्श्‍वभुमीवर आज सायंकाळी जामसंडे येथील बाजारात पोलीसांनी संचलन केले. याबाबत स्थानिक व्यापारी राजेंद्र पाटील यांना विचारले असता, बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी केले. 

दरम्यान, आज सकाळी येथील ग्रामीण रूग्णालयात 90 जणांची कोरोना जलद चाचणी घेण्यात आली. यामध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये विजयदुर्ग पोलीस ठाण्याशी संबधित पाच पोलीस, येथील बंदरातील सात मच्छीमार, जामसंडे भागातील तिघेजण तर एका शिरगांवमधील व्यक्‍तीचा समावेश आहे. तसेच दुपारी पुन्हा 71 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दिवसभरात एकूण 161 जणांची तपासणी होऊन त्यातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jamsande Market Shut Down Due To Corona