मुंबई - गोवा महामार्गावरील 85 वर्षापूर्वीचा 'हा' पुल झाला इतिहास जमा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

मुंबई आणि गोवा ही दोन शहरे रस्ता मार्गे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी 1930 पासून कोकणातील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली. यात जानवली नदीवरील पुलाचे काम 1931 मध्ये सुरू झाले.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - गेली 85 वर्षे कित्येक टनांचा भार सहन करूनही मजबूत असलेला जानवली नदीवरील ब्रिटिशकालीन पूल इतिहास जमा होत आहे. महामार्ग चौपदरीकरणात हा पूल तोडण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळ्यापूर्वी याच ठिकाणी नवीन तीन पदरी पुलाची उभारणी होणार आहे. 

मुंबई आणि गोवा ही दोन शहरे रस्ता मार्गे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी 1930 पासून कोकणातील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली. यात जानवली नदीवरील पुलाचे काम 1931 मध्ये सुरू झाले. 4 नोव्हेंबर 1934 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी कार्यान्वित झाला. या पुलासाठी त्यावेळी 1 लाख 37 हजार 669 रुपये अंदाजित खर्च होता. प्रत्यक्षात 1 लाख 22 हजार 500 रूपये एवढा खर्च आला. 

हेही वाचा - सिंधुदुर्गनगरी सुंदरी ही ठरली 

"गॅनन डंकर्ले आणि कंपनी'च्या अभियंत्यांनी या पुलाच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले होते. पुलाचे तत्कालीन अभियंता ए. एच. व्हाईट, एच. जे. एस. कझिन्स आणि एस. ए. मिर्झा, पा. कृ. शिंदे, कृ. जा. मोहिते यांच्या देखरेखीखाली या पुलाचे काम करण्यात आले. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्याहस्ते या पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या पुलावरून कित्येक टनांची अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरू होती. 

महामार्ग चौपदरीकरणात मुंबई गोवा महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल तोडले जात आहेत. यापूर्वी कणकवली शहरालगतच्या गडनदीवरील पूल तोडून तेथे तीन पदरी दोन पूल बांधण्यात आले आहेत. जानवली नदीवर देखील 2014 मध्ये नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले; मात्र मुख्य कंपनी आणि पोट ठेकेदार यांच्या वादात या पुलाचे काम गेली पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने गेल्या महिन्यात नव्या पुलाचे काम पूर्ण केले. त्यानंतर गेल्या चार दिवसापासून या पुलावरून वाहतूक सुरू झाली. आज ब्रिटिशकालीन पूल पोकलेन मशिनच्या साहाय्याने तोडला जात आहे. 

हेही वाचा - चांदा ते बांदा योजना सुरू ठेवण्याची शिवसेनेची मागणी 

दगड, माती आणि चुना यांचा वापर करून बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाच्या आठवणी जपल्या जाव्यात यासाठी यापूर्वी अनेकवेळा चर्चा झाली होती. कणकवली नगरपंचायतीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी झाली होती. ही बाब खर्चिक असल्याने ब्रिटिशकालीन पुलाच्या आठवणी जपण्याचा विषय मागे पडला. गतवर्षी गडनदीवरील ब्रिटिशकालीन पूल पाडून तीन महिन्यात नवीन पुलाची उभारणी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर जानवली पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तीन ते चार महिन्यात नव्या पुलाची उभारणी होईल आणि त्यावरून वाहतूक सुरू होईल, असे दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janavali Bridge Destroyed From Highway Sindhudurg Marathi News