सिंधुदुर्गनगरी सुंदरी 'ही' ठरली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राजक्ता बिले, तन्वी चांदुरकर यांनी काम पाहिले. 

ओरोस ( सिंधुदुर्ग) - भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या ओरोस महोत्सवाचा समारोप सिंधुदुर्गनगरी सुंदरी या स्पर्धेने झाला. या आंतरराज्य सिंधुदुर्गनगरी सुंदरी स्पर्धेत 22 विवाहित - अविवाहित सुंदरींनी सहभाग घेतला होता. अखेरच्या क्षणापर्यंत उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी सुंदरी होण्याचा मान पूजा राणे हिने मिळविला. तिला मानाचा मुकुट व जरीपट्टा तसेच रोख 10 हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र पूनम राऊत यांच्या हस्ते देण्यात आले. 

या स्पर्धेत द्वितीय विजेती ऋतुजा जाधव तर तृतीय विजेती भक्ती जामसंडेकर ठरल्या. बेस्ट कन्सलेटर माधवी शहापुरे, बेस्ट कॉश्‍युम आरती डांगळे, बेस्ट कॅटवॉक विद्या मदाकजे, बेस्ट स्माईल उत्कर्षा पावसकर, बेस्ट फोटोजर्निक फेस रुचिता शिर्के यांना मान मिळाला. या सर्वांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, सिद्धि सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राजक्ता बिले, तन्वी चांदुरकर यांनी काम पाहिले. 

हेही वाचा - मोपा विमानतळाचा मार्ग मोकळा 

3 जानेवारीपासून ओरोस महोत्सवाचे आयोजन केले होते. ओरोस गावातील महिलांना सहभाग घेता यावा, यासाठी वाडी-वाडीवर होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी सिंधुदुर्गनगरी स्पर्धेपूर्वी झाली. यात नम्रता वरक विजेत्या तर समिधा रासम उपविजेत्या ठरल्या. एकेरी नृत्यु, समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण झाल्यानंतर ओरोस फाटा नजिक असलेल्या गोविंद सुपर मार्केटनजिक आकर्षक व्यासपीठावर ही रोमहर्षक सिंधुदुर्गनगरी स्पर्धा झाली. गेले दोन दिवस जोरदार सुरु झालेल्या गुलाबी थंडीच्या कडाक्‍यात एकापेक्षा एक अशा 22 लावण्यवतींमुळे पहिल्याच फेरीत लक्षवेधी ठरली. त्यातच सूत्रसंचालक संजीव साळवी यांनी आपल्या यापूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर ही स्पर्धा अधिक रंगतदार केली.

हेही वाचा - शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे घरात घुसले अन्... 

वक्तशिरपणा, समंजसपणा व हजर जबाबीपणा यांच्या जोरावर साळवी यांनी या स्पर्धेची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु झालेली ही स्पर्धा मध्यरात्रीनंतर 1 वाजता स्पर्धेच्या अंतिम निकालाने संपली. 
स्पर्धेत एकूण तीन फेऱ्या झाल्या. पहिली फेरी कॅटवॉक व ओळखपरेड, दूसरी फेरी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवीणारी म्हणजे सहावारी साडी परिधान करून कॅटवॉक आणि आवडीच्या विषयावर प्रश्नफेरी तर तीसरी फेरी ही टॅलेंट म्हणजेच आवडीची कला सादर करणे अशा एकूण तीन फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीनंतर 22 मधून 12 स्पर्धकांची निवड करण्यात आली. तर दुसऱ्या व तिसऱ्या फेरिनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत गोवा, पालघर येथील स्पर्धकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Rane Sindhudurgnagari Sundari Sindhudurg Marathi News