यंदाचा गोविंदा गर्दीच्या गर्तेत नाही, नियमांच्या फेर्‍यात

राजेश शेळके 
Tuesday, 11 August 2020

दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे विरजण; हंड्यांमध्ये निम्याने घट

रत्नागिरी : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. गोविंदांच्या जल्लोषाचा दिवस म्हणून गोपाळकाल्याकडे पाहिले जाते. थरावर थर लावणारी गोविंदा पथके आता गर्दीच्या गर्तेत नाही, तर सोशल डिस्टन्सींगसह नियमांच्या फेर्‍यात अडकली आहेत. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी दहीहंडींची संख्या गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. 

शासनाच्या आदेशाचे पालन करीत जिल्हा प्रशासनाने काही नियम व अटी घालून गोपाळकाला साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु उद्या गोपाळ काला असला तरी पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाने नियमावली स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे गोविंदा आणि आयोजकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. यामध्ये अनेक सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गोविंदा... रे! गोपाळाच्या जयघोष करीत मोठ्या उत्साहात गोविंदा दहीकाला साजरा करतात. 

हेही वाचा - बाप्पाच्या उत्सवासाठी चाकरमान्यांना असे करावे लागणार सुट्ट्यांचे नियोजन..

राजकीय पक्ष यामध्ये उतरल्याने दहीकाला प्रतिष्ठेचा बनत गेला. जास्तीत जास्त थरांना सर्वाधिक बक्षीस दिले जाते. तसेच थरांच्या सलामिलाही बक्षीस असते. त्यासाठी बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र कोरोनाच्या महामारीचा यावर मोठा परिणाम झाला आहे.

दरवर्षी पेक्षा यावर्षी दहिहंडीमध्ये मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात 247 ठिकाणी सार्वजनिक 1520 ठिकाणी खासगी दहीहंडी उत्सव होणार आहे. मागील वर्षी सुमारे 3 हजार 40 ठिकाणी हंडी बांधण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र यामध्ये घट झाली आहे. बदललेल्या नियमांसह दहीहंडी थरार अनुभवण्यास गोविंदा पथकांनी जल्लोषात तयारी केली आहे. नेहमी मोठ्या गर्दीच्या गर्तेत असलेले गोविंदा पथक किंवा गोविंदा आता नियम, अटींच्या कचाट्यात सापडले आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत मुर्तीकलेचा वारसा नसणारा कुंभार...

गेली काही वर्ष दहीहंडीकरीता मोठ्या रक्कमेच्या बक्षीसांसह अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी चित्रपटश्रृष्टीतील सेलिब्रेटींच्या उपस्थितीत या सणाला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. मात्र यावर्षी कोरोनाने सगळ्याला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे यावर्षी दहीहंडीची स्पर्धा रद्द झाली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दही हंडीचा जल्लोष पहायला मिळणार नाही.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janmashtami celebration with rules and regulation in ratnagiri