खतातेंनी भाजप आमदाराच्या प्रतिमेला जोडे मारले, मात्र पत्रकार परिषदेत...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

खेर्डीत अद्ययावत पाणी योजनेच्या कामात पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यावर खतातेंनी राजकीय दबावातून गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले होते.

चिपळूण ( रत्नागिरी ) -  खेर्डीतील पाणी योजनेच्या साठवण टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी संबंधित जमीनमालकांचे संमत्तीपत्र घेण्याचे ठरले होते, मात्र जयंद्रथ खताते यांनी संमत्तीपत्र घेण्यापूर्वी जादा दराची जागा खरेदी केली. जमीनमालकांना मोबदला दिला नसताही दडपशाही, हुकूमशाही करून रस्त्याचे काम केले. जमिनींची नासधूस केली. त्यामुळेच चौकशीअंती गुन्हा दाखल झाला. यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांची हुकूमशाही खेर्डीत चालणार नाही, असा इशारा पाणी योजनेच्या संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत दिला. 

खेर्डीत अद्ययावत पाणी योजनेच्या कामात पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यावर खतातेंनी राजकीय दबावातून गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले होते.

यावर तक्रारदार व पोलिस सेवेत असलेले आप्पा दाभोळकर म्हणाले, ""खतातेंना मी राजकारणात आणले आहे. त्यांनी गेल्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीत सत्तेच्या माध्यमातून दरोडेच टाकले आहेत. पाणी योजनेला लोकांचा विरोध नाही. रस्त्यासाठी जमीनमालकांना विश्‍वासात घेण्याचे ठरले होते. तसे न करता त्यांनी थेट रस्ता केला. लोकांचा तीव्र विरोध झाल्यावर रस्त्याचे काम थांबले. साठवण टाकीच्या जागेसाठी 90 हजार प्रति गुंठा व 1 लाख अशा दोन जागा सुचवल्या होत्या. त्यांनी जादा दराची जागा खरेदी केली. त्यांनी ग्रामपंचायत व पाणीपुरवठा समितीचे खोटे ठराव दिले. खतातेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत.'' 

ज्येष्ठ नेते खाकटू खताते म्हणाले, ""टाकीसाठीची जागा खरेदी केल्यानंतर जमीनमालकांना 4 महिन्यांनंतर चर्चेसाठी बोलावले. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 9 फूट जमीन घेत 18 फूट रस्ता ठरल्यानंतर एकाच बाजूने रस्ता केला. परिणामी लोकांनी विरोध केला. रेल्वे प्रशासनाला 16 लाख दिले. जमीनदारांना टोलवून हुकूमशाहीने रस्त्याचे काम केले. यापुढे त्यांची हुकूमशाही चालणार नाही. या वेळी नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर, विकल्पा मिरगल, दशरथ दाभोळकर, प्रकाश साळवी उपस्थित होते. 

ग्रामसभेत झाली होती खडाजंगी 
पाणी योजनेबाबत 18 मे 2019 ला खास पाणी योजनेसाठी ग्रामसभा झाली. या सभेत तत्कालीन सरपंच जयश्री खताते या आप्पा दाभोळकरांच्या अंगावर धावून गेल्या. त्याचवेळी त्यांचा निषेध करीत अविश्‍वास दाखल करण्यात आला. खेर्डीत अविश्‍वासाची ही पहिलीच लाजीरवाणी घटना आहे. 

पत्रकार परिषदेत भाजप शेजारी 
खासदार शरद पवार यांच्यावर भाजप आमदार पडळकरांनी टीका केल्यानंतर जयंद्रथ खतातेंनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले, मात्र पत्रकार परिषद घेताना याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले. ही पक्षनिष्ठा कसली, असा मुद्दाही धाकटूशेठ खताते यांनी मांडला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayandrath Khatate Protest BJP MLA But In Press Conference