रत्नागिरी तालुक्यात मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

मिऱ्या, काळबादेवी, गणपतीपुळे, जयगड या भागात मोठ्या प्रमाणात जेलीफिश सापडत आहेत. झुंडीने असलेले जेलीफिश माशांवर तुटून पडतात. त्यांच्या भीतीने मासे किनारी भागातून गायब झाले आहेत.

रत्नागिरी - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणाऱ्या रत्नागिरी तालुक्‍यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट आ वासून उभे आहे.

गेले आठवडाभर 10 वावापर्यंत मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या संकटांचा सामना करणाऱ्या मच्छीमारांपुढे सध्या जेलीफिशचे संकट आ वासून उभे राहिले आहे. 

मिऱ्या, काळबादेवी, गणपतीपुळे, जयगड या भागात मोठ्या प्रमाणात जेलीफिश सापडत आहेत. झुंडीने असलेले जेलीफिश माशांवर तुटून पडतात. त्यांच्या भीतीने मासे किनारी भागातून गायब झाले आहेत. जेलीफिश जाळी फाडत असल्याने नुकसाने होते. मतलई वारे सुरू झाल्यामुळे तो किनारी भागाकडे येतो. गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना जेलीफिशची भीती आहे. त्याचा अंगाला स्पर्श झाला तर प्रचंड खाज सुटते. त्यामुळे मासेमारीला जाणे अनेकांनी टाळले होते.

आठ दिवसांपूर्वी म्हाकुळसह 10 ते 15 किलो मासळी जाळ्यात सापडत होती. जेलीफिशने यावर पाणी फेरले. गेले दोन दिवस वाऱ्याची दिशा बदलू लागल्याने जेलीफिशचे संकट कमी होईल, अशी आशा आहे. ते खोल समुद्रात निघून जातील किंवा किनाऱ्यांवरील खडकाळ भागात आपटून फुटून जातील. हे संकट कमी झाले तरच अर्थकारण सुधारेल, अशी आशा मच्छीमार व्यक्‍त करत आहेत. 

दरम्यान, ट्रॉलिंगसह पर्ससिन नेटवाल्यांना 12 वावाच्या पुढे खोल समुद्रात बऱ्यापैकी मासा मिळत आहे. सध्या सरंगा, टायनी कोळंबी, सुरमई, बांगडा चांगल्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. कोळंबी 120 ते 220 रुपये किलो, बांगडा 100 रुपये किलो, सुरमई 350 रुपये किलो तर सरंगा 100 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे. 

मिऱ्या किनाऱ्यावर जेलीफिश आढळू लागल्याने आठवडाभर मच्छीमार मासेमारीसाठी गेलेले नाहीत. गिलनेटने मासेमारी करणारे अडचणीत आले आहेत. 
- श्रीदत्त भुते, मच्छीमार  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jellyfish Crisis In Front Of Fishermen Ratnagiri Marathi News