तोच महिना, तोच दिवस काजळीला पूर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

मुसळधार पावसाने कहर केला असून, नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा वेढा बसलेला आहे. ही परिस्थिती दरवर्षी कोकणात आढळून येते.

रत्नागिरी -  जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस हे कोकणवासीयांसाठी नित्याचेच झाले आहे; परंतु तोच महिना आणि तोच दिवस अशा सलग वर्षात पूरस्थिती निर्माण होण्याचा योग रत्नागिरीत यंदा अनुभवण्यास मिळाला आहे.

काजळी नदीच्या पुराने गेले तीन दिवस थैमान घातले असून त्याचा प्रभाव चांदेराईसह सोमेश्‍वर, पोमेंडीत किनारी भागात दिसत आहे. गतवर्षीही याच दिवशी काजळीच्या पुराने या गावांना वेढा घातला होता. पोमेंडी येथील पटवर्धन यांच्या घराजवळ काजळीच्या पुराचे पाणी शिरले होते. 

मुसळधार पावसाने कहर केला असून, नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा वेढा बसलेला आहे. ही परिस्थिती दरवर्षी कोकणात आढळून येते. नदीला आलेला पूर ही नवीन गोष्ट नसली तरीही त्याच दिवशी आणि त्याच तारखेला पूर येण्याचा योग कधी उद्‌भवत नाही.

कधी जून महिन्यात, तर कधी जुलैमध्ये, अगदी नाहीच तर ऑगस्ट महिन्यात पूर येतो; परंतु यंदा जसा काजळी नदीला पूर आला आहे, तसाच गतवर्षी 5 ऑगस्ट 2019 ला पूर आला होता. गतवर्षी 5 ऑगस्टला नागपंचमी होऊन गेली होती. त्यावेळी मुसळधार पावसाबरोबरच पंचमीच्या नंतर आलेल्या भरतीच्या ताणाची भर पडली होती. यंदा गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पाऊस सुरू झाला. त्याचा जोर चार दिवस कायम आहे.

यंदाही 5 ऑगस्टला पावसाचा जोर राहिल्यामुळे काजळी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी किनाऱ्यावरील सर्व परिसरांत घुसले आहे. पोमेंडी येथील ग्रामस्थ पटवर्धन यांच्या शिवारात पुराचे पाणी आले आहे. गतवर्षी पण त्याच जागी तेवढेच पाणी आलेले होते. असा योग गेल्या अनेक वर्षांत प्रथमच आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kajali River Flood Situation Ratnagiri Marathi News