कणकवलीः संतप्त कलमठवासियांनी महावितरणला घेरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

कणकवली - शहरालगतच्या कलमठ गावासह आशिये, वरवडे आदी गावांत गेले तीन दिवस वीज पुरवठा ठप्प आहे. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी कलमठमधील लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयाला घेराओ घातला.

कणकवली - शहरालगतच्या कलमठ गावासह आशिये, वरवडे आदी गावांत गेले तीन दिवस वीज पुरवठा ठप्प आहे. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी कलमठमधील लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयाला घेराओ घातला.

यावेळी उपस्थित उपकार्यकारी अभियंता गिरीश भगत यांच्यावरही ग्रामस्थांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. अखेर उद्यापासून (ता.9) कलमठ गावातील सर्व वीज समस्या दूर करू अशी ग्वाही श्री. भगत यांनी दिली. यानंतर घेराओ आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या 48 तासांपासून कलमठ गावातील वीज गायब आहे. त्याबाबत संपर्क साधूनही महावितरणचे वितरणचे अधिकारी आणि वायरमन फोन उचलत नाहीत. फोन उचलले तर नागरीकांना वायरमनकडून उद्धट उत्तरे दिली जातात. बिडयेवाडी, गावडेवाडीसह काही भागात कमी दाबाने वीज पुरवठा होतोय. मोटार पंप आणि इतर विद्युत उपकरणे चालत नाहीत.

कलमठच्या अनेक भागात अजूनही स्ट्रीट लाइट बसविण्यात आलेली नाही अशा अनेकविध तक्रारी यावेळी ग्रामस्थांनी मांडल्या. पुढील काळात कलमठवासीयांचा उद्रेक झाला तर त्याला महावितरणचे अधिकारीच जबाबदार असतील, असा इशारा देखील सरपंच वैदेही गुडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड यांनी दिला.

घेराओ आंदोलनावेळी सरपंच वैदेही गुडेकर, शिवसेना विभागप्रमुख अनुप वारंग, बाळू मेस्त्री, बाबू आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य धनश्री मेस्त्री, लेखा मेस्त्री, अप्पा कुलकर्णी, शाखाप्रमुख राजू कोरगावकर, अरूण परब, स्वरा कांबळी, सचिन पवार, संदीप वरक, चेतन पाटील, विलास राठोड, सायली धुत्रे उपस्थित होते.

गेली तीन वर्षे कलेश्वर मंदिरानजीक पाण्यात लाइन तुटून पडली आहे. वायरमन व अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार अप्पा कुलकर्णी यांनी केली. त्यावर कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांनी आपण स्वत: लक्ष घालून आजच्या दिवसभरात ती वायर काढून देतो असे सांगितले. तसेच कलमठ गावातील सर्व वीज समस्या आज सायंकाळपर्यंत दूर होतील. उद्यापासून वीज पुरवठा खंडित होणार नाही अशी ग्वाही श्री. भगत यांनी दिली.

चिखलाची आंघोळ घालण्याचा इशारा
कणकवलीत विद्युत पुरवठा सुरळीत असतो तेव्हा कलमठमधील विद्युत पुरवठा खंडित का असतो? अशी विचारणा बाळू मेस्त्री यांनी केली. तर वायरमन ग्राहकांशी उद्धट बोलत आहेत. ते पुन्हा गावडेवाडीत आल्यास त्यांना चिखलाची अंघोळ घालू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalmath villages agitation in Mahavitaran office Kankavali