चौपदरीकरण सीमांकनात सावळा गोंधळ; कणकवली नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधी संतप्त 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

कणकवली शहरात गड ते जानवली नदी या दरम्यान 45 मिटरचे भूसंपादन करण्यात आले

कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात गटाराचे बांधकाम करताना हायवेच्या ताब्यातील एक दोन ते तीन मिटर जागा मोकळी सोडून बांधकाम होत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्‍त केला. तर ही मोकळी जागा अनधिकृत बांधकामांसाठी ठेवली जात आहे का? असा प्रश्‍न नागरिकांतून व्यक्‍त करण्यात आला. 

कणकवली शहरात गड ते जानवली नदी या दरम्यान 45 मिटरचे भूसंपादन करण्यात आले. यात हायवे हद्दीपासून एक ते दीड मिटर अंतर जागा पाणी पुरवठा पाइप लाइन, वीज वाहिन्यांसाठी मोकळी सोडून गटाराचे बांधकाम केले जाणार होते. मात्र प्रत्यक्षात हायवे ठेकेदाराने अनेक ठिकाणी दोन ते तीन मिटर जागा मोकळी सोडून गटाराचे बांधकाम केल्याचे आज मोजणी दरम्यान स्पष्ट झाले. 

शनिवारी (ता.23) शहरातील पटवर्धन चौकात गटाराचे बांधकाम केले जात होते. मात्र पुरेसे अंतर सोडून हे बांधकाम होत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदींसह इतर नगरसेवकांनी तेथे धाव घेऊन गटाराचे काम बंद पाडले होते. तसेच आधी हद्द निश्‍चित करा नंतरच गटाराचे बांधकाम करा अशीही भूमिका नगराध्यक्षांनी घेतली होती. त्यानुसार आज दुपारी हायवे ठेकेदाराच्या अभियंत्यांनी मोजणी करण्यात आली. त्यावेळी पटवर्धन चौक ते तेलीआळी डीपी रोड या दरम्यान तब्बल दोन ते तीन मिटर जागा मोकळी सोडून गटाराचे बांधकाम होत असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे या प्रकाराबाबत नगरपंचायतीमध्ये येऊन माहिती द्या असे नगराध्यक्ष नलावडे यांनी हायवे ठेकेदार प्रतिनिधी आणि महामार्ग अधिकाऱ्यांना सुनावले; मात्र आज सायंकाळपर्यंत हायवे ठेकेदार प्रतिनिधी आणि महामार्ग अधिकारी नगराध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित झाले नव्हते.   
 
शहरातील जनतेसाठी आवश्‍यक असणारी पाणी पुरवठा वाहिनी, भूमिगत वीज वाहिन्या आणि नियोजित गॅस वाहिनी यासाठी दीड मिटरची जागा सोडूनच गटाराचे बांधकाम करा असे स्पष्ट निर्देश आम्ही हायवे अधिकारी आणि ठेकेदाराला दिले आहेत. 
- समीर नलावडे, नगराध्यक्ष कणकवली 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kankavali Highway quadrangle