Kokan आंदोलनाचा इशारा प्रशासन जागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kankavali Nagave road development  work Warning

Kokan : आंदोलनाचा इशारा; प्रशासन जागे

कणकवली : शहरातील पटकीदेवी मंदिर ते नागवे हद्द या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आजपासून सुरू झाले. येत्‍या त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपतर्फे दिला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतल्याचे दिसते.

शहर भाजपतर्फे चार दिवसांपूर्वी पटकीदेवी मंदीर ते नागवे हद्द रस्त्याच्या दुरवस्थेबाबत उपकार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाचे काम मंजूर असल्‍याची माहिती उपकार्यकारी अभियंत्‍यांनी दिली होती; मात्र आम्हाला मंजुरीचे आदेश नकोत. तर प्रत्यक्षात काम केव्हा करणार ते सांगा, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी पटकी देवी मंदिर ते स्वयंभू मंदिरपर्यंतचे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

भाजपचे किशोर राणे, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांचे देखील लक्ष वेधले होते.

तर आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सदर कामाबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार लगेचच आज सोमवारपासून या कामाची प्रत्यक्षात सुरुवात झाली. याबद्दल भाजपतर्फे पालकमंत्र्यांचे आभार मानल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

रेल्वेस्टेशन रस्त्याचीही दखल

दरम्यान, कणकवली रेल्वेस्टेशन रोडवरील खड्डेही तातडीने बुजवा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे केली होती. त्यावर आठ दिवसांत रेल्वेस्टेशन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची ग्वाही कार्यकारी अभियत्यांनी दिल्याची माहिती नलावडे यांनी दिली.