esakal | वैद्यकीय अधिकाऱ्यांना कणकवलीत घेराओ 
sakal

बोलून बातमी शोधा

 Kankavali Sub-District Hospital isse

दरम्यान, रुग्णालयातील गैरसुविधा आणि पैसे घेतले जात असल्याच्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक मंगळवारी (ता.24) उपजिल्हा रुग्णालयात बैठक घेणार आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना कणकवलीत घेराओ 

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून दिले जाणारे दाखले आणि रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप आज भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ घालून आंदोलनही केले. दरम्यान, रुग्णालयातील गैरसुविधा आणि पैसे घेतले जात असल्याच्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक मंगळवारी (ता.24) उपजिल्हा रुग्णालयात बैठक घेणार आहेत. यावेळी आमदार नीतेश राणे यांचीही उपस्थिती असेल, अशी माहिती नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिली. 

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी पाच दिवसांपूर्वी आंदोलन केले होते; मात्र या कालावधीत रुग्णालयातील गैरसुविधा दूर झाल्या नसल्याने भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, नगरसेविका मेघा गांगण, अण्णा कोदे आदींसह इतर कार्यकर्त्यांनी आज पुन्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात बसलेल्या डॉ. सतीश टाक यांना धारेवर धरले. 

दरम्यान, भाजप कार्यकत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि डॉ. श्‍याम पाटील हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच असुविधा असलेल्या वॉर्ड क्रमांक 15ची पाहणी केली. तेथील दुरवस्था पाहून त्यांनी सदर प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाने गांभीर्याने घ्यायला हवा होता, असे स्पष्ट केले. तसेच शौचालयांच्या अस्वच्छतेची बाब योग्य नाही असे सांगत यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना हा प्रकार निदर्शनास आणू, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. 

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णांकडून दाखले आणि शस्त्रक्रियेसाठी पैसे उकळले जात असल्याचा मुद्दा मांडला. तसेच वैद्यकीय अधीक्षक आठवड्यातून दोनच दिवस रुग्णालयात हजर असतात तरीही हजेरी पुस्तकावर त्यांच्या महिन्याच्या उपस्थितीच्या स्वाक्षरी कशा? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री यांनी केला. नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार हा रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला. यानंतर मंगळवारी (ता.24) जिल्हा शल्यचिकित्सक कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयात येऊन भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. 

पैसे घेतानाचा व्हीडिओ 
दरम्यान, भाजपच्या एका कार्यकर्त्याने डॉक्‍टर दाखल्यासाठी 200 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ दाखवला आणि या प्रकाराचा जाब विचारला. यावर संबंधित डॉक्‍टर म्हणाले, "त्या व्यक्‍तीने माझ्या खिशात हात घातला; मात्र तो कशासाठी घातला हे माहिती नव्हते.' हे उत्तर ऐकूण भडकलेल्या नगरसेविका मेघा गांगण यांनी संबंधित डॉक्‍टरांना चांगलेच धारेवर धरले. 

संपादन - राहुल पाटील

loading image