
लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे.
ओरोस (सिंधुदुर्ग) : लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे.
16 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लाच घेताना हांगे यांना सकाळी रंगेहाथ पकडले होते. सातबारा नोंद मंजूरीसाठी हांगे यांनी या लाचेची मागणी केली होती. ओरोस येथील पद्मनाभ परब (वय 60) यांनी कायदेशीर खरेदी केलेल्या जमीन खरेदी खताची सातबारावर नोंद मंजूर करण्याची मागणी केली होती; मात्र मंडळ अधिकारी हांगे यांनी यासाठी दहा हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यानी हांगे यानी मागणी केलेल्या रक्कमेतील चार हजार देण्याचे मान्य केले होते.
हेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा : कृषिपंप वीजजोडणीसाठी मोहीम; महावितरणचे कृषी ऊर्जा पर्व
याबाबत कुडाळ येथील जिल्ह्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारिची शहानिशा करून 16 ला कसाल येथील मंडळ अधिकारी कार्यालयात तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास पाठविले होते. ही लाच संदीप हांगे यानी स्वीकारल्यानंतर सापळा लावून बसलेल्या लाचलूचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या कार्रवाईचे स्वागत कसाल बाजारपेठेत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता.
17 फेब्रुवारीला हांगे यांना न्यायालयात हजर केले असता 20 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाली होती. आता ते जामिनावर मुक्त आहेत. दरम्यान मंजुलक्ष्मी यांनी त्यांना निलंबित केले आहे.
संपादन- अर्चना बनगे