
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : नगराध्यक्ष या नात्याने शहराच्या विकासात कोणतेही राजकारण आणणार नाही. त्यासाठी आमदार केसरकर यांचीही मदत घेऊ, अशी ग्वाही येथील नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीतील संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. केसरकर यांनीही शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.
येथील पालिकेत सत्ताबदलानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शितयुद्ध सुरू होते. या पार्श्वभूमीवर ही संयुक्त पत्रकार परिषद विशेष ठरली. शहरासाठीचा रिंगरोड हेणे अपेक्षित आहे. यासाठी प्रस्तावित रिंग रोडवर ज्यांनी इमारतीसाठी तसेच घरासाठी परमिशन घेतली आहे, त्यांच्याशी चर्चा करून सकरात्मक तोडगा काढला जाईल, असे परब यांनी आज येथे स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, मनोज नाईक, दिपाली सावंत, भारती मोरे, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर म्हणाले, 'तब्बल वर्षानंतर मी पालिकेमध्ये आलो. हे शहर आणि पालिका माझ्या घराप्रमाणे आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ता कोणाची असली तरी आमचे वैयक्तिक चांगले संबंध असल्याने शहराच्या विकासामध्ये कधीही राजकारण करणार नाही. त्यामुळे शहरातील मुख्य भाग सोडला तर उर्वरित शहराबाहेरील जो भाग आहे, तो शहराप्रमाणेच विकसित व्हावा, यासाठी पालिकेने रिंग रोड आपल्या ताब्यात घेऊन तो राष्ट्रीय महामार्गाच्या स्वाधीन करावा.
या रिंग रोडसाठी आवश्यक असलेले 40 कोटी रुपये रक्कम जिल्हा नियोजन मंडळाकडून देणे शक्य नाही. त्यामुळे नगरविकास खात्याने या भूसंपादनासाठी विशेष बाब म्हणून पैसे द्यावे. मी लवकरच नगर विकास खात्याच्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. शहरातील विकास कामासंदर्भात राज्याकडून तसेच जिल्हा नियोजनकडून लवकरच निधी उपलब्ध करून देणार आहे.'
ते पुढे म्हणाले, 'या ठिकाणी आज मी नगराध्यक्षांशी चर्चा केली. यात शहरातील रेंगाळलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हेल्थफार्मचे काम पूर्ण करण्याच्या सुचना संबधित ठेकेदाराला दिल्या आहेत. रघुनाथ मार्केटचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न आहेत. उद्यानामधील कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुका क्रीडा केंद्र शहरामध्ये मंजूर आहे. यासाठी पालिकेमध्ये ठरावही झाला आहे. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने बांद्याचे नाव समोर आले आहे.
पालिकेने त्यासंदर्भात निर्णय घेतल्यास बांद्यासाठी वेगळा निधी आणावा लागेल आणि त्यासाठी माझा प्रयत्न राहिल. जिमखाना मैदानावरील पॅव्हेलियनसाठीही प्रयत्न होणार आहेत. शहरात हॉकर्स झोन केल्यास अनेकांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी बैठक आयोजित करावी. विकासाच्या कामावर सगळ्यांनी एकत्र यावे त्यासाठी आजची ही चांगली सुरुवात आहे.'
मल्टीस्पेशालिटी शहरातच
शहरात मंजूर असलेले आणि भूमिपूजन झालेले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सावंतवाडी शहरात होणार आहे. त्यासाठी राजघराण्याशी चर्चा सुरू आहे. त्यांना विश्वासात घेऊन यातून जागेबाबत सुवर्णमध्य काढू. त्यात यश न आल्यास दुसरा पर्याय निवडू; मात्र काही झाले तरी मल्टीस्पेशालिटी हे शहरात होणार असल्याचे आमदार केसरकर यांनी आज येथे सांगितले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.