
देवगड - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत कोकणचा राजा ‘हापूस’ स्थानिक बाजारात दाखल झाला आहे. प्रमाण कमी असले तरी स्थानिक पातळीवर खरेदी-विक्री केंद्र सुरू होऊ लागली आहेत. शनिवारी (ता.६) होणाऱ्या पाडवा सणासाठी बाजारात ग्राहकांना हापूस उपलब्ध झाला आहे. दरम्यान, यंदाचा हंगाम धिम्यागतीने सुरू असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली.
यंदा हापूस आंब्याचा सुरुवातीपासूनच खडतर प्रवास सुरू आहे. सातत्याने बदलते हवामान, अधूनमधून होणारे ढगाळ वातावरण, यामुळे हापूस हंगाम अडचणीत आल्याचे चित्र आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे यंदाचा हंगाम अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यातून आता स्थानिक पातळीवर आंबा खरेदी-विक्री केंद्र सुरू होत आहेत. बाजारात पाडव्याच्या मुहूर्तासाठी हापूस आंबा विक्रीस उपलब्ध झाला आहे.
अलीकडे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचा आंबा खरेदी करून किंवा स्वतःच्या बागेतील तयार आंबा स्थानिक पातळीवर खरेदी- विक्री केंद्रामार्फत विक्रीस उपलब्ध करून देण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या पसंतीनुसार आंबा खरेदी करण्याची संधी मिळते. आता गुढीपाडवा जवळ येत आहे. यानिमित्त आंबा खरेदी करणारे ग्राहक असतात. वाशी फळबाजारात हापूस आंबा जाऊ लागला आहे. तालुक्याच्या विविध भागांतून फळांचा राजा बाजारात जात आहे. अजून यात नियमितपणा नसला तरी यंदाच्या हंगामाची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
मानांकनाचा फायदा
कोकणातील आंब्याला ‘हापूस’ नावाने मानांकन मिळाल्यामुळे बागायतदारांसह ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. मानांकनामुळे ‘हापूस’च्या नावाखाली अन्य ठिकाणच्या आंबा विक्रीला लगाम बसणार आहे. यातून ग्राहकांनाही पसंतीनुसार आंब्यासाठी किंमत मोजल्याचे समाधान मिळेल.
३०० ते ८०० रुपये डझन
आंब्याचा दर सध्या तरी चढा राहणार असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर सुमारे ३००, ८०० रुपये डझनचा भाव सुरू आहे. बारीक फळे (बिटका आंबा) १०० रुपये डझनने विकला जात आहे. वातावरण बदलामुळे यंदा हंगाम लांबणार असल्याचे तसेच एकूणच उत्पादन तुलनेने कमी राहणार असल्याचे काही ज्येष्ठ आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.