"किंगमेकर' संजू परब "किंग' 

Kingmaker Sanju Parab As King Of Sawantwadi Marathi News
Kingmaker Sanju Parab As King Of Sawantwadi Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - भाजपचा प्रभावी निवडणूक फॉर्म्युला आणि शिवसेनेला मतविभागणीचा बसलेला फटका याच्या जोरावर "किंगमेकर' म्हणून ओळख असलेले संजू परब सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत "किंग' ठरले. तब्बल 25 वर्षांच्या दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी शहरातील वर्चस्वाला खासदार नारायण राणे पर्यायाने भाजपने धक्‍का दिला. हा पराभव केसरकरांसाठी भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आत्मरीक्षण करणारा आणि भाजपसाठी उभारी देणारा ठरणार आहे. 

सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी याचा खरा धक्‍का आमदार दीपक केसरकर यांना बसला आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आत्मा सावंतवाडी शहरात वसतो असे म्हणणे अतिशयोक्‍तीपूर्ण ठरणार नाही. त्यांच्या आत्तापर्यंतच्या तिन्ही आमदारकीच्या विजयात या शहरातील मतांचा मोठा वाटा राहिला आहे; पण याच शहरात पूर्ण ताकद लावूनही शिवसेनेचा झालेला पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्‍का म्हणावा लागेल. 

केसरकरांचा बालेकिल्ला उध्वस्त

सावंतवाडी पालिकेला राजकारणाचा समृध्द वारसा आहे. या शहराने दिर्घकाळ कॉंग्रेसला साथ दिली. केसरकरांच्या वर्चस्वाआधी या पालिकेवर ऍड. दिलीप नार्वेकर नगराध्यक्ष होते. त्यांचे वर्चस्व उलथवून केसरकर शहराचे सत्ताधीश झाले. जवळपास 25 वर्षे त्यांचे पालिकेवर वर्चस्व राहिले. ते सांगतील तो नगराध्यक्ष अशी स्थिती अगदी कालपरवापर्यंत होती. त्यामुळे हा त्यांचा बालेकिल्ला उध्वस्त करण्याचे खासदार नारायण राणेंचे स्वप्न प्रत्यक्षात येणे सोपे नव्हते. या पोटनिवडणूकीने हेच स्वप्न सत्यात उतरले आहे. 

शिवसेना गाफिल राहील्याचा फटका

राणे आधिक भाजप अशा दोन राजकीय शक्‍ती एकत्र येत ही लढत देत होत्या; मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा लढतीत मिळालेल्या मताधिक्‍यांच्या गृहितकावर शिवसेना गाफिल राहिली. विधानसभेत शिवसेना - भाजपची एकत्र मते होती याचे रणनिती आखताना त्यांना फारसे भान राहिले नसल्याचा फटका निकालातून दिसला. 

भाजपचा फाॅर्म्यूला यशस्वी

भाजपने राबविलेला निवडणूक फॉम्यूला त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण ठरला. एक - एक मत केंद्रीत करून रणनिती आखण्यात आली. वैभववाडी, कणकवली आणि देवगड नगरपंचायतीच्या लढतीत आमदार नितेश राणे यांनी हाच फॉर्म्युला वापरत विजय मिळवला होता. भाजपची जिल्ह्यातील ताकद यासाठी शहरात उतरवण्यात आली होती. प्रभागवार मतांची गणिते मांडत प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती.

शिवसेनला मत विभागणीचा सर्वाधिक फटका

विजयासाठी आवश्‍यक मतांचे गणित मांडून तितक्‍याच मतांकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या तुलनेत शिवसेनेचा प्रचार विस्कळीत होता. शहरात असलेली पारंपारीक व्होट बॅंक गृहीत धरून प्रचार केला जात होता. प्रभागवार लक्ष ठेवणारी फारशी प्रभावी यंत्रणा नव्हती. लोकांना गृहीत धरल्याने महाविकास आघाडी पर्यायाने शिवसेनला मत विभागणीचा सर्वाधिक फटका बसला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र आघाडी मतदारांनी स्विकारली नसल्याचा कौल आंब्रड पाठोपाठ सावंतवाडीनेही दिला. 

नार्वेकर यांच्या मतांचा महाविकास आघाडीला फटका

येथे ऍड. दिलीप नार्वेकर यांची उमेदवारी भाजपला फायद्याची ठरली. कॉंग्रेसने शिवसेनला पाठिंबा दिला असला तरी पक्षाच्या चिन्हावर ऍड. नार्वेकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. शिवसेनेने कॉंग्रेसची मते आपल्याला पडतील असे गृहीत धरले; पण नार्वेकर यांनी 674 इतकी मते घेतली. ती महाविकास आघाडीला फटका देणारी ठरली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना मिळालेली 309 मतेही महाविकास आघाडीच्या वाट्याची होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अन्नपूर्णा कोरगावकर यांना मिळालेल्या 578 मतांमध्ये बहुसंख्य भाजपच्या वाट्याला जाणारी असली तरी भाजपला पर्याय शोधणाऱ्या काठावरच्या मतांचाही यात काही प्रमाणात सहभाग असणार आहे. तो अल्प वाटाही महाविकास आघाडीचा असू शकला असता. मत विभागणी दोन्ही प्रमुख पक्षांची झाली असली तरी यात शिवसेनेला बसलेला फटका मोठा आहे. 

राणेंचा प्रभावी प्रचार 

गेल्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर बबन साळगावकर निवडून आले होते; मात्र नगरसेवक पदाच्या संख्या गणितात राणे समर्थकांची सरशी झाली होती. यात संजू परब किंगमेकर ठरले होते. राणेंनी या निवडणूकीत परब यांना उतरविले. त्यांनी आपल्या नेतृत्वाचा कस लावत प्रभावी प्रचार केला. भाजप, राणे समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जोडीनेच आमदार नितेश राणेंची रणनिती, परब यांचे नेतृत्व कौशल्य याच्या जोरावर ते "किंग' ठरले. 

केसरकरांना मोठा धक्का 

हा पराभव केसरकर यांना मोठा धक्‍का देणारा आहे. त्यांना आपल्या राजकीय तंत्रात बदल करण्याचा धडा या लढतीने दिला आहे. राजकीय दहशतवादाचा मुद्‌दा, एकहाती प्रचार यंत्रणा, आता प्रभावी ठरत नसल्याचे यातून पुढे आले, यामुळे त्यांनी पर्यायाने शिवसेनेला राजकीय ध्येयधोरणात बदल न केल्यास पुढच्या काळात कोकणात भाजप त्यांच्यावर "भारी' पडण्याची शक्‍यता आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com