सोमय्यांच्या दौऱ्याने दापोलीत वातावरण तंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचा रिसाँर्ट तूटणार, २६ मार्च चला दापोली' असे ट्वीट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते.

सोमय्यांच्या दौऱ्याने दापोलीत वातावरण तंग

दाभोळ - भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे मुरुड येथील बहुचर्चित रिसाँर्टचे बांधकाम (Resort Construction) प्रतीकात्मक तोडण्यासाठी हातोडा (Hammer) घेऊन मुंबई येथून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यासह निघाले असल्याने दापोली व मुरुड येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त (Police Bandobast) ठेवण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग कालपासून दापोली येथे तळ ठोकून बसले आहेत.

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचा रिसाँर्ट तूटणार, २६ मार्च चला दापोली' असे ट्वीट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते, आज सकाळी मुंबई येथून माजी खासदार किरीट सोमय्या हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सोबत घेऊन दापोली येथे निघाले असून अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

सोमय्या यांना दापोलीत रोखणार असा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी दिला होता त्यावर अडवूनच दाखवा असे प्रत्युत्तर माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनीही दिल्याने दापोलीत राडा होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दापोली व मुरुड येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दापोलीतील प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अनेकांना सीआरपीसी १४९ अन्वये नोटीसा देण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी १५ मार्च ते २९ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला असून सोमय्या यांचे दौर्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी तुम्ही वैयक्तिक जबाबदार राहाल अश्या नोटीसा पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या सहीने देण्यात आल्या आहेत.

दरम्यान काल कर्दे येथे मुरुड व कर्दे येथील रिसाँर्ट मालकांची बैठक झाली यात किरीट सोमय्या यांच्या दौर्यामुळे पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वादात स्थानिक पर्यटन व्यावसायिक भरडला जात असून या व्यावसायिकांना महसूल विभागाकडून नोटीसाही आल्याने हे व्यावसाईक धास्तावले आहेत. त्यांनी काल दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची भेट घेऊन किरीट सोमय्या यांना मुरुड येथे येण्यास मनाई करावी अशी विनंती केली आहे.

माजी आमदार संजय कदम यांनी आपण स्थानिकांसोबत असल्याचे सांगितले.

दरम्यान किरीट सोमय्या यांच्या दौर्याने भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून दापोली तालुका भाजपतर्फे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे दापोली शहरात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या हे दापोली शहरात आल्यावर प्रथम दापोली पोलीस ठाण्यात जाणार असून त्यानंतर मुरुड येथे रवाना होणार आहेत.

Web Title: Kirit Somaiya Tour In Dapoli Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..