अस्थिभंगाची कारणे जाणून वेळीच उपचार करा

अस्थिभंगाची कारणे जाणून वेळीच उपचार करा

(२८ मे टुडे ३)

चिरायू भव----------लोगो


- rat१०p१.jpg-
२४M८९१४७
डॉ. नितीन चव्हाण

कोणत्याही प्रकारच्या अस्थिभंगासाठी प्रथमोपचार करताना इजा झालेल्या भागाची हालचाल होऊ न देणे व इजेचे स्वरूप वाढू न देणे याचे भान ठेवावे लागते. अस्थिभंग झाला असल्यास तो भाग स्थिर ठेवण्यासाठी व आधारासाठी लाकडी फळी, जाड पुठ्ठा, तत्सम प्रकारच्या स्प्लिंट चा वापर करावा, जेणेकरून वेदना कमी होतील व इजा गंभीर स्वरूपाची होणार नाही.

- डॉ. नितीन चव्हाण
Email ID -
nitin२२२५५@gmail.com

--------

अस्थिभंगाची कारणे जाणून वेळीच उपचार करा


अस्थिभंग म्हणजे हाडांचे फ्रॅक्चर -कोणत्याही आघातामुळे हाडांची सलगता नाहीशी होऊन निर्माण झालेल्या अवस्थेला अस्थिभंग म्हणतात.
कारणे :
* प्रत्यक्ष आघात - शरीराच्या कोणत्याही भागाला जोराचा मार किंवा आघात झाल्यास (उदा. काठी, धातूची वस्तू, दगड इ.) अथवा वाहनाच्या चाकाखाली सापडणे.
* अप्रत्यक्ष आघात - यात शरीराच्या किंवा हाडाच्या एका भागात मार लागतो, पण फ्रॅक्चर दुसऱ्या बाजूला होते - उंचावरून, अडखळून पडताना हाताचा आधार घेतल्यास त्या आघातामुळे खांद्याशेजारील हाड किंवा मनगटाच्या हाडाला इजा पोचते.
* स्नायूंचे आकुंचन - अचानकपणे जोरात स्नायूंचे आकुंचन पावल्याने अस्थिभंग होतो. मांडी व पायाच्या स्नायूंमुळे गुढघ्याच्या वाटीचा अस्थिभंग.
* प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आघात - दोन्ही आघात एकाचवेळी झाल्यास होणाऱ्या दुखापती. घोटा मुरगळला तर तिथल्या हाडांचे फ्रॅक्चर होते.

अस्थिभंगाचे प्रकार -
१. बंदिस्त अस्थिभंग - हाडावरील त्वचेला इजा झालेली नसते पण आतील हाडाचा अस्थिभंग होतो.
२. उघड अस्थिभंग - अस्थिभंगासोबत जखम असते किंवा तुटलेल्या हाडाचे टोक जखमेच्या बाहेर येते. अश्या वेळी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
३. चुर्णीत अस्थिभंग - हाडाचे दोनपेक्षा जास्त तुकडे किंवा चुरा झाल्यामुळे होणाऱ्या इजा.
४. रुतीव अस्थिभंग - फ्रॅक्चर झाल्यावर मोडलेल्या हाडांची टोके एकमेकांत रुतून बसतात .
५. लवचिक अस्थिभंग - लहान मुलांमधील हाडे लवचिक असल्याने अस्थिभंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
६. दबका अस्थिभंग - एक हाड दुसऱ्या हाडाखाली दबले जाणे- कवटीच्या हाडांचा अस्थिभंग, मणक्याच्या हाडांचा अस्थिभंग
७. आजारामुळे होणारा अस्थिभंग - हाडांचा ठिसूळपणा किंवा कर्करोग यामुळे होणारा अस्थिभंग

विशिष्ट प्रकारचे अस्थिभंग -
१. बरगडी मोडणे - यामुळे आतील अवयवांना - फुफ्फुसे, यकृत, प्लिहा ला इजा झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो.
२. मणक्याचा अस्थिभंग - आतील मज्जारज्जूला इजा झाल्यास संवेदना, हालचाल दोन्हींवर परिणाम होऊन पक्षाघात होऊ शकतो.
३. कमरेच्या हाडाचा अस्थिभंग - अतिशय तीव्र स्वरूपाच्या आघातामुळे विशेषतः वाहन अपघातात याचे प्रमाण जास्त असते. यात मूत्राशयाला इजा झाल्यास आजाराचे गांभीर्य वाढते.

अस्थिभंगाची लक्षणे -
१. वेदना - कमीअधिक प्रमाणात होतात
२. स्पर्शासहत्व - फ्रॅक्चर झालेल्या भागाला रुग्ण हात लावू देत नाही
३. सूज - मार लागलेल्या भागात सूज येते, काही वेळा तो भाग काळानिळा पडतो.
४. हालचाल न होणे, कमी होणे - वेदना सहन होत नसल्याने त्या भागाच्या हालचालीवर मर्यादा येतात.
५. बेढबपणा - त्या भागाचा बाह्यआकार बदलतो
६. कार्यशक्ती नाहीशी होणे
७. अस्वाभाविक हालचाल
८. चुरगळल्यासारखा आवाज येणे

निदान :

अस्थिभंगाच्या निदानासाठी तज्ज्ञांनी केलेली शारीरिक तपासणी अत्यंत आवश्यक असते. मार लागलेल्या भागाचा एक्स रे काढून बऱ्याचशा अस्थिभंगाचे निदान होते. काही विशिष्ट किंवा क्लिष्ट भागांच्या फ्रॅक्चरसाठी सीटी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅनचा वापर केला जातो - सांध्याजवळील फ्रॅक्चर, मणक्याचे किंवा कवटीचे फ्रॅक्चर.

उपचार :

१. प्लास्टर वापरून केलेले उपचार - तीव्रता कमी असलेले - यांसाठी अर्धे प्लास्टर किंवा पूर्ण प्लास्टर ठराविक कालावधीसाठी वापरून अस्थिभंग झालेले हाड जुळण्यास मदत होते. या उपचार पद्धतीसाठी काही वेळेस भूल देण्याची गरज भासू शकते.
२. शस्त्रक्रिया - फ्रॅक्चर सांधण्यासाठी धातूयुक्त (स्टील किंवा टायटॅनियम ) - तार, प्लेट आणि स्क्रू, विविध प्रकारच्या सळ्या, कृत्रिम सांधा यांचा उपयोग होतो. क्वचितप्रसंगी हाडाच्या मजबुतीसाठी बोन सिमेंट, पेशंटच्याच विशिष्ट हाडाचा भाग, कृत्रिम हाड वापरले जातात.
३. काहीवेळा अस्थिभंगाबरोबर रक्तवाहिन्या, नसा, मज्जारज्जू यांना झालेल्या इजांसाठी त्या त्या क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची मदत घेतली जाते.
अस्थिभंगासारखी सांध्याना होणारी इजा म्हणजे सांधा निखळणे - आघातामुळे सांध्यातील अस्थीबंधनाना इजा होते व त्यामुळे सांधा निखळण्याचे प्रमाण वाढते. वेदना, सूज येणे, त्या अवयवांची हालचाल न होणे व त्या भागाला बेढबपणा येणे ही प्रमुख लक्षणे दिसून येतात. याचे निदान शारीरिक तपासणी व एक्स रे द्वारे होते. निखळलेला सांधा त्वरित त्याच्या मूळ जागेवर बसवणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर नसा, शीरा यांपैकी एक किंवा दोघांना कायमस्वरूपी इजा होऊ शकते. पहिल्या वेळी सांधा निखळल्यास - (खांदा किंवा कोपर) यांचे प्रमाण अधिक असते, त्या मानाने खुबा व गुडघा यांचे कमी प्रमाण असते, भूल देऊन सांधा पूर्ववत जागी बसविला जातो व पुन्हा निखळू नये म्हणून विशिष्ट कालावधीसाठी पट्टा किंवा प्लास्टरचा उपयोग करून उपचार केले जातात. सांधा निखळण्याचे प्रसंग वारंवार होत असल्यास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यावर उपचार होऊ शकतात.

हे लक्षात असू द्या -
१. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
२. दुचाकीसाठी हेल्मेट व चारचाकीसाठी सीटबेल्टचा वापर कायम करावा, जेणेकरून अपघात झाल्यास जीवास धोका निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.
३. विशिष्ट प्रकारचे खेळ खेळताना, सायकलिंग करताना संरक्षक उपकरणे हेल्मेट, पॅड घालणे आवश्यक
४. वयस्कर व्यक्तींनी चालताना किंवा जिन्यावरून चढऊतार करताना आधारासाठी काठी, वॉकरचा उपयोग करणे गरजेचे आहे, जेणेकरून अडखळून पडण्याची शक्यता कमी होईल.
५. हाडांच्या मजबुतीसाठी पूरक आहार व औषधे ( कॅल्शियम व व्हिटॅमिन डी) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.
हाडे व सांध्याना होणाऱ्या विविध प्रकारच्या इजा यांचे गांभीर्य ओळखून त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच उपचार केले तर भविष्यात उद्भवणारे अनर्थ टाळता येतील.

(डॉ. चिरायु हॉस्पिटल रत्नागिरी येथे अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com