Konkan: डॉ. बाबासाहेबांच्या आंबडवेत येणार राष्ट्रपती ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बाबासाहेबांच्या आंबडवेत येणार राष्ट्रपती ?

मंडणगड : डॉ. बाबासाहेबांच्या आंबडवेत येणार राष्ट्रपती ?

मंडणगड : भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार आहेत. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी ही स्मारक भेट होणार असल्याची माहिती हाती आली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे आंबडवे आणि पंचतीर्थ घोषित अन्य ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार चाचपणी व तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंबडवे या गावी प्रथमच राष्ट्रपती येणार आहेत. राष्ट्रपतींचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा नियोजित असून यात किल्ले रायगड भेटीचाही समावेश आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या स्थळांना पंचतीर्थ म्हणून घोषित केले. यामध्ये त्यांचे मूळगाव आंबडवे, जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवास स्थान आणि दिल्लीतील २६ अलिपूर रोड यांचा समावेश आहे. आंबडवे गावाला स्थानिकपासून राज्य, देशपातळीवरील मंत्री, नेते, अधिकाऱ्यांनी भेटी देत आदर्श संसद ग्राम, पंचतीर्थ, शिल्पसृष्टी, पर्यटनभवन, डिजिटल गाव, राष्ट्रीय महामार्ग अशा लाखों, कोटींच्या विकासकामांची आश्वासने दिली; मात्र ही आश्वासने हवेत विरली आहेत.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

.. ही संविधानकारांची उपेक्षाच

आदर्श संसद ग्रामयोजनेअंतर्गत आंबडवे हे गाव दत्तक घेण्यात आले होते; मात्र त्यातून या परिसराचा किती विकास झाला, हा शोधाचा विषय ठरणारा आहे. अत्यंत गाजावाजा करून पंचतीर्थ घोषित झालेले आंबडवे आजही सोयीसुविधा, विकासापासून कोसो दूर राहिल्याने संविधानकारांची ही उपेक्षाच केल्याच्या भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे.

देशाला संविधान देणाऱ्या संविधानकारांच्या मूळ गावाबाबत दिखावूपणाच्या भूमिकेमुळे घटनात्मक दर्जा मिळालेल्या व्यक्ती संविधानिक मूल्याची पायमल्ली करीत आहेत. राष्ट्रपती यांच्या भेटीने यामध्ये बदल व्हावा. फक्त राजकीय स्टंट ठरू नये.

-सुदामबाबा सकपाळ ,आंबडवेचे ग्रामस्थ व अभ्यासक

loading image
go to top