Kokan : क्रिकेटपटू कोळेकरांच्या कुटुंबाला मिळणार घर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घर

Kokan : क्रिकेटपटू कोळेकरांच्या कुटुंबाला मिळणार घर

सावंतवाडी : ‘सामाजिक बांधिलकी’ संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडीतील माजी क्रिकेटपटू (कै.) तानाजी कोळेकर यांच्या घराला अखेर नवे स्वरुप प्राप्त झाले आहे. हलाखीचे जीवन जगणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना संस्थेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेले घरकुल लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. १३) हा कार्यक्रम होणार आहे.

यासाठी संस्थेचे पदाधिकारी रवी जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांनी पुढाकार घेऊन हे घरकुल प्रत्यक्षात साकार केले. त्यासाठी सावंतवाडी शहरातील अनेक दानशुरांनी हातभार लावला. येथील सालईवाडा भागात कोळेकर कुटुंबीयांचे हे निवासस्थान आहे. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तसेच घरात कोणीच कर्ता पुरुष नसल्यामुळे त्यांचे घर मोडकळीस आले होते. याबाबत त्यांनी माजी नगराध्यक्ष साळगावकर यांचे लक्ष वेधले होते. साळगावकर यांनी याची दखल घेत आपले सहकारी रवी जाधव, संजय पेडणेकर यांच्या मदतीने त्यांना घर बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला.

प्रथम दर्शनी हे घर काही रकमेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात छप्पराचे काम हातात घेण्यात आले; मात्र छप्पर उंच झाल्याने आणि मातीच्या भिंती असल्याने त्या अर्धवटस्थितीत राहिल्या. त्यामुळे पुन्हा भिंतीचा प्रश्न निर्माण झाला. भिंतीसह आतील जमीन तसेच विजेची व्यवस्था आदी गोष्टींसाठी आणखी खर्च लागणार होता. त्यामुळे संस्थेच्या सहकार्‍यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना हाक देऊन त्यांच्या सहकार्यातून घराचे काम अखेर पूर्ण केले. गुरुवारी हे घर कोळेकर कुटुंबाला सुपुर्द करण्यात येणार आहे.