कोकणवासीयांचा सवाल : श्रमिक रेल्वे सेवा सुरू केल्याचे श्रेय घेणारे पुढारी गेले तरी कुठे...?

 तुषार सावंत
Wednesday, 29 July 2020


गणेशोत्सव साजरा करण्याचा कालावधी कमी दिवसावर येऊन ठेपला आहे.

 कणकवली (सिंधुदुर्ग) : गेल्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात परप्रांतीयांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावापर्यंत मोफत प्रवास देण्याचे श्रेय अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या पदरात पाडून घेतले.म्हणून आता कोकण रेल्वे सुरू करण्याचा विषय पुढे आला तेव्हा हे पुढारी आहे तरी कुठे असा सवाल कोकणवासी विचारू लागले आहेत ?

हेही वाचा- वाढीव वीजबिलप्रश्नी मनसे आक्रमक, उचलले टोकाचे पाऊल -

गणेशोत्सव साजरा करण्याचा कालावधी कमी दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यातच कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना 14 दिवसाचे विलगीकरण असायला हवे असा दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनाकडे ७ ऑगस्ट ही अखेरची डेडलाईन आहे. त्यानंतर चाकरमानी जरी गावात आले तरी त्यांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता येऊ शकतो का असा प्रश्न पुढे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांची अपेक्षा आहे. ती ही फार मापक आहे. मुंबई पुण्यातून कोकणाकडे येण्यासाठी कोकण रेल्वे हाच पर्याय आहे. श्रमिक रेल्वे सेवा जेव्हा सुरू झाली,  तेव्हा अनेकांनी  त्याचे श्रेय लुटले. परप्रांतीयांना मात्र मोफत प्रवास आणि कोकणवासीयांवर प्रतीक्षेची टांगती तलवार,  ही खंत आता थेटपणे सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागली आहे. 

हेही वाचा- गृहराज्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्ग पोलिस दलाची प्रशंसा, म्हणाले... -

याचे कारण कोकणातील प्रवाशांना रेल्वेने घेऊन जा, आम्हाला मोफत नको वाजवी दरात विशेष गाड्या सोडा ही मागणी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबई-पुणे व इतर भागातून रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी शेकडोंनी निवेदने रेल्वे मंत्रालयाकडे रवाना करण्यात आली आहेत.पण याचा साधा विचारही झाल्याचे दिसत नाही. राज्यातील विशेषत:  कोकणशी संबंधित असलेले बडे नेते शांत झोपत आहेत. अन्यथा आपली आक्रमकता माध्यमांकडे मांडणारी ही मंडळी आता मूग गिळून गप्प का ? कोकणवासीयांचे देणे -घेणे त्यांना राहिले नाही का ? असा सवालही चाकरमानी विचारू लागले आहेत. केंद्र सरकार आणि त्यांचे सगळे नेते राम मंदिराच्या भूमिपूजन   सोहळ्यात गुंतल्याने त्यांना कोकणच्या प्रवाशांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसावा अशी खंतही मुंबईचे चाकरमानी आता व्यक्त करू लागले आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kokan people 14 day quarantine August 7 is the deadline ganesha festival