कोलगाव काजरकोंड पुल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

सावंतवाडी - कोलगाव येथील काजरकोंड पुल जीर्ण झाल्याने याठिकाणी पडलेले खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या खड्ड्याची डागडूजी करा व पावासळ्यानंतर नव्याने पुल उभारा, अशी मागणी शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आज गटविकास अधिकारी गजानन भोसले यांच्याजवळ करण्यात आली.

सावंतवाडी - कोलगाव येथील काजरकोंड पुल जीर्ण झाल्याने याठिकाणी पडलेले खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या खड्ड्याची डागडूजी करा व पावासळ्यानंतर नव्याने पुल उभारा, अशी मागणी शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आज गटविकास अधिकारी गजानन भोसले यांच्याजवळ करण्यात आली.

कोलगाव काजरकोंड हे पुल सखल भागात आहेत. ते बऱ्याच वर्षापुर्वीचे आहे. पावसाळ्यात दरवर्षी हे पुल मोठ्या पावसात पाण्याखाली जाते. त्यामुळे सावंतवाडी शहर व कोलगाव येथील संपर्क तुटतो. सद्यस्थित जीर्ण झालेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या पुलाला रॅलींग नसल्याने वाहन चालवितांना अपघात होण्याची शक्‍यता आहे. शहरातील रिक्षा चालकांचा या पुलावरून नेहमीचा प्रवास असतो. त्यामुळे या पुलावरील खड्डे तात्काळ बुजवून रिक्षा चालकांना दिलासा मिळावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष धर्मेद्र सावंत, जिल्हा सेक्रेटरी सुधिर पराडकर, संतोष केळूसकर, पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत, वासुदेव परब, चंदू म्हापसेकर, सुभाष तावडे आदी रिक्षा व्यवसाईक उपस्थित होते. याबाबत पराडकर म्हणाले, ""शहरातील रिक्षा चालकांचा या पुलावरून जास्त प्रवास असतो. सद्यस्थितीत पुलावर आठ इंचाचे मोठे खड्डे पडले आहेत. पुलावर पावसाचे पाणी आल्यावर या खड्डयाचा अंदाज चालकांना येत नाही. अलीकडेच दोन रिक्षाचालक अपघात होता होता वाचले. पुलाला दोन्ही बाजुला रॅलींग नसल्यानेही अपघात होऊ शकतो. खड्डे वेळेत न बुजविल्यास याठिकाणी भगदाड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तात्काळ खड्डे बुजविणे गरजेचे आहे.''

याबाबत कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांना विचारले असता ते म्हणाले, ""काजरकोंड पुलाचा प्रश्‍न मार्गी काढण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केला असून राज्य शासनाच्या बजेटमधून याला निधी देण्याची ग्वाही केसकर यांनी दिली आहे. पावसाळ्यानंतर निधी मंजूर होताच या पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे.''

""कोलगाव काजरकोंड पुल हे जीर्ण झाले आहे. शिवाय सखल भागात असलेल्या या पुलामुळे पावसाळ्यात सावंतवाडी शहर व कोलगाव दोन्हीकडचा संपर्क तुटतो. हे पुल हे नव्याने बांधण्यात यावे, निधी मंजूर व्हावा, यासाठी आपण शासनाचे लक्ष वेधत पाठपुरावा केला आहे. शिवाय कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचेही लक्ष वेधले होते.''
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष, सावंतवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolgaon Kajarkond bridge in danger