
चिपळूण : कोळकेवाडी धरण अर्धा टीएमसी रिकामे ठेवणार
चिपळूण : अतिवृष्टीत वीजनिर्मितीचे पाणी वाशिष्ठीला सोडले जात असल्याने पूरपरिस्थितीला पूरक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या कालावधीत वीजनिर्मिती बंद ठेवण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने बुधवारी कोकण विभागीय अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत केली. त्याप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. याचवेळी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोळकेवाडी धरण अर्धा टीएमसी रिकामे ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील घेण्यात आला.
येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीला प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, चिपळूण बचाव समितीचे सदस्य व जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिवृष्टीत वीजनिर्मिती सुरू ठेवली जात असल्याने व कोळकेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होतो. तेव्हा या कालावधीत वीजनिर्मिर्त बंद ठेवण्यात यावी, तसेच अतिवृष्टीचा अंदाज घेऊन कोळकेवाडी धरण अर्धा टीएमसीने रिकामे ठेवल्यास पूरस्थिती नियंत्रणात येऊ शकते. सलग १० तास पाऊस झाला तरी कोळकेवाडी धरणात अतिवृष्टीचे पाणी साचून राहू शकते. शिवाय कोळकेवाडी धरणाच्या वक्र दरवाजांची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अनेक वर्षांत दरवाजे उघडले नसल्याने आयत्यावेळी ते उघडणे शक्य होत नाही. यावर घोगरे यांनी यासदंर्भात तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले.
विजय घोगरे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती देताना सांगितले, दोन दिवसांत आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतले जातील. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट यंत्रणा बसविण्यात येणार आहे. नागरिकांना मेसेज स्वरूपात अतिवृष्टी व पर्जन्यमापक संबंधी माहिती मिळण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी कोळकेवाडी व नांदिवसे येथे पर्जन्यमापक केंद्र उभारले जाणार आहे. वाशिष्ठी पुलावर वॉटर गेज मीटर उभारले जाणार आहे. समितीने हे सारे निर्णय लेखी स्वरूपात द्यावेत, कारण अंमलबजावणी होत नाही, असा आरोप केला. ४ दिवसांत लेखी स्वरूपात बैठकीचा वृतांत देण्याचे आश्वासन घोगरे यांनी दिले.
आपत्तीकरिता स्वतंत्र समिती
चिपळुणात वारंवार होणारी पूरस्थिती व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व चिपळूण बचाव समितीच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आपत्तीवेळी समन्वय राखण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
यंत्रणा वाढविण्यात येईल
उक्ताड येथील बेटावर गाळ काढण्यासाठी यंत्रणा वाढविण्यात येईल. ५ पोकलेन, २७ डंपर, ५डोझर, अशी यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चालक नसल्याने जलसंपदा विभागाचे डंपर बंद असून ठेकेदार पद्धतीने घेतलेले चालकदेखील उपयोगी येत नाहीत. त्यात सुधारणा करण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने केली.