कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांकडून माणुसकीचे दर्शन : नुकसानग्रस्त दहा गावात केले बागा आणि शेती उभी करण्याचे काम...

मुझफ्फर खान
सोमवार, 13 जुलै 2020

बागायतदांरांवरील संकटाचे ढग अधिकाधिक काळुकुट्टे झाले असतानाच.....

चिपळूण (रत्नागिरी) :  निसर्ग चक्रीवादळात दापोली तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाले. कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कर्मचारी नुकसानग्रस्त दहा गावात श्रमदान करून उद्धवस्त झालेल्या बागा आणि शेती उभी करण्याचे काम करत आहेत. कोरोना आणि चक्रीवादळामुळे शेतकरी व बागायतदांरांवरील संकटाचे ढग अधिकाधिक काळुकुट्टे झाले असताना विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांकडून ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे. 

हेही वाचा- दिला इशारा मात्र जहाज समुद्रात : त्या जहाजाचा खर्च कोटीच्या घरात.... -

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त दापोलीला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र कोरोनानंतर आलेल्या या संकटामुळे शेतकरी व बागायतदारांवर निराशेचे मळभ दाटून आले आहेत. शासनाकडून मदत मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या प्राथमिकस्थरावर बाग स्वच्छ करण्याचे गरजेचे आहे. लॉकडाउनमुळे मजूरही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाचे कर्मचारी शेतकर्‍यांची शेती व बागा स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. तुटलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला करून कटरच्या सहाय्याने शेतकर्‍यांना उपयोगी येईल अशी लाकडे तोडून देत आहेत. विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या या उपक्रमामुळे शेतकरी व बागायतदारांना मोठा दिलासा मिळाले आहे. 

हेही वाचा- या महिलांनी घेतला पुढाकार अन् या बहुगुणी व बहुउपयोगी औषधाची केली लागवड.... -

कोकण कृषी विद्यापीठाचे 70 टक्के कर्मचारी कोरोना नियंत्रणात आणण्याच्या कामगिरीवर  आले आहेत. तरीही विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कर्मचारी असे 25 जण एका बसने नुकसानग्रस्त भागात जातात. शेतकरी व बागायतदारांना हवी असलेली मदत करतात. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शैक्षणिक व क्रिडा विभागाचे संचालक डॉ. व्ही. जी. नाईक यांना या उपक्रमाचे प्रमुख केले आहेत. चक्रीवादळ झाल्यानंतर चौथ्या दिवसापासूून विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचे मदत कार्य सुरू झाले ते आजही सुरू आहे. कर्मचार्‍यांनी स्वखर्चाने 7 कटर विकत घेतले. तीन कटर वन विभागाकडून मिळाले. दहा कटरच्या माध्यमातून आठवड्यातील तीन दिवस श्रमदान केले जाते. कर्मचारी जेवणाचे डबे आणि पाणीही सोबत घेवून जातात. केळशीतील एका शेतकर्‍याची अडीज एकर बाग एकाच दिवसात कर्मचार्‍यांनी स्वच्छ केली. केळशी, वेळास, मुरडी, आडेसह दहा गावांमध्ये बागायतदारांना उभारी देण्याचे काम विद्यापीठाचे कर्मचारी करत आहेत.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Konkan Agricultural University staff Shramdan in ten villages