अशी एक आठवण : कोकण किनाऱ्याचे असेही वैभव

Konkan beach  story in kokan
Konkan beach story in kokan

रत्नागिरी : आजच्यासारखी हवामानाचा अंदाज बांधणारी यंत्रणा विकसित नव्हती. चंद्र, सूर्य आणि आकाशात ठाम उभा असणारा ध्रुव, रात्री नालीवर टांगलेला लाल कंदील आणि दीपस्तंभ हेच जीपीएस. अनुभवाच्या ठोकताळ्यावरच सर्व यंत्रणा चाले. कर्र कर्र आवाज करणारं सुकाणू आणि वादळवाऱ्याशी खेळणाऱ्या खलाशांच्या हिंमतीवर प्रसंगी कित्येकवेळा जोरदार वादळाला तोंड द्यावे लागे. महिनोन्‌महिने आपले गलबत कुठे आहे, याचा पत्ता मालकांच्या कुटुंबीयांना नसे. तार हा मोठा दिलासा. कुठेतरी मध्येच गलबत निवाऱ्यासाठी थांबवून गलबताची खुशाली कुटुंबीयांना दिली जायची. चार अक्षरांनीदेखील सर्व लोकांचा जीव भांड्यात पडे.

त्या वेळी मी स्वतःचा मासेमारीचा व्यवसाय करत होतो. ज्या ठिकाणी मासा असेल, अशा बंदरात बोटी महिनोन्‌महिने थांबत व मासेमारी करत. साधारणपणे १९९० चा मार्च-एप्रिल महिना असावा. त्या वेळी माझी लाँच देवगड बंदरात होती. कापशी नावाची कोळंबी ४० वाव पाण्यात मिळत होती. मी अशा फिशिंगला पहिल्यांदाच गेलो. पहाटे ४ वाजता बंदरातून निघावे लागे. सूर्य उगवता-उगवता ठिकाणावर पोहचता येई. चार वाजता इंजिन चालू करून मी पुन्हा झोपलो. सकाळी आठ-साडेआठ वाजता पहिली डोल घेण्याची वेळ आली. मला त्या वेळी तांडेलाने उठवले. मी उठलो, केबिनमधून डोकावून पाहिले. सगळीकडे अथांग समुद्र. आमच्यासारख्या असंख्य लाँची. सहज डावीकडे पाहिले तर बापरे! मालवाहतूक बोटींची रांगच्या रांग. त्या अजस्त्र बोटींची रांग पाहून धडकी भरली.

माझ्याकडे पाहून तांडेल म्हणाला, ही मालवाहतूक बोटींची जागा आहे. मालाची ने-आण करणाऱ्या या बोटी पाहिल्यानंतर मला आठवले ते माझ्या काळबादेवीच्या समुद्रकिनाऱ्यावरून पाहिलेले वैभव. शिडांच्या गलबतांची रांगची रांग. गलबत, मचवे, बीरीग, कोट्ये अशा असंख्य प्रकारच्या शिडांच्या नौकांची रांग. निसर्गाशी संघर्ष करत धाडसाने जगणारी माणसं मी पाहिली. त्यांची श्रीमंती, त्यांची मेहनत मी पाहिली. मालवाहतूक प्रवासाची धाडसी वर्णने मी त्यांच्या तोंडून ऐकली.


संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हणजे धाडसी दर्यावर्दी लोकांची वस्ती. मोठी गलबते म्हणजे दोनशे ते तीनशे टनपर्यंत माल वाहतूक करणारे. साधारणपणे ती लाकडाची वाहतूक करत. मंगलोरी कौलाचीदेखील वाहतूक होई. या गलबतात आम्हा मुलांना सुरवातीला सत्यनारायणाच्या पूजेच्यावेळी जाण्याची संधी मिळे. एखादा मजबूत खलाशी होडीतून बोचक्‍यासारखा उचलून आम्हाला गलबतात घेई. प्रचंड भूयारासारखं दिसणार गलबत. बांबूची साटी आणि झावळांपासून बनवलेली एक छोटीशी केबिन त्यात विराजमान सत्यनारायण. भरपूर प्रसाद याने मन प्रफुल्लित होई. कपीवर कसरत करणाऱ्या दिमाखदार डोल काठ्या, पाण्याला समांतर डोलणारा बोंब आणि परबानाला गुंडाळलेले पांढरं शुभ्र शीड. 

हेही वाचा- अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वार्‍याचा वेग वाढला : मुसळधार पावसाचा इशारा -
त्या काळी आमचं गाव गलबतवाल्यांचं गाव म्हणूनच ओळखलं जायचं. गावात शेट्ये, मैर, परकर, जोशी, नार्वेकर अशा कित्येक लोकांची लहानमोठी गलबतं होती. मिरकरवाड्यातील बिरादर कुटुंबीय मुरूगवाड्यातील वाघधरे यांची गलबतंदेखील खाडीत असत. कोकण किनारपट्टीवर बिरादर कुटुंबीयांनी गलबताला पहिलं इंजिन बसवलं. हळूहळू अस्तित्वात असलेल्या सर्व गलबतांना इंजिन बसवलं. चार शिडं सोडून घोसात जाणारी गलबते आता एक शीड उभारून व्यापार करू लागली.
पावसाच्या तोंडावर मोसम संपवून ‘हंय-लेसा-हाईसा’ करत गलबत डागडुजीसाठी किनाऱ्यावरती घेत. डवूराच्या आवाजाने सारी खाडी दणाणून निघायची. बारागावचे पाणी प्यायलेले हे लोक निरक्षर होते. तरी व्यवहारात मात्र लखपती होते. काळबादेवीतील असाच एक दर्यावर्दी गणपत महादेव शेट्ये. त्यांनी साठ वर्षांपूर्वी आपल्या स्वकष्टाच्या कमाईतून पंचक्रोशीत हायस्कूल सुरू 
केलं. 


डोलकाठी, परबण, शीड, कप्पी..
कित्येक गलबतं वादळात सापडून बुडाली. काही जाग्यावर फुटली. कोकण किनाऱ्यावरील हे वैभव कॅमेराने टिपता आली नाही. पण अजूनही ती चार चार शीड सोडून ये-जा करणाऱ्या गलबतांची रांग डोळ्यासमोरून हल्ली नाहीत. गलबतांचे कित्येक अवशेष डोलकाठी, परबण, एखादे  शीड, नांगर, कप्पी, अवाढव्य डोलकाट्या पेलणाऱ्या कात्याच्या दोऱ्या अजूनही कुठे कुठे शिल्लक आहेत. दर्यावर्दी लोकांची स्मृति जपणार हे साहित्य एकत्रित व्हावं आणि त्याचं एक छान म्युझियम व्हावं.

-प्रसाद तथा बापू गवाणकर, काळबादेवी, रत्नागिरी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com